Breaking


आदिवासी समाजातील महाराष्ट्र चॅम्पियन सखाहरी बर्डे मदतीच्या प्रतिक्षेत, घरची परिस्थिती हलाखीची


अहमदनगर : शरीरसौष्ठव स्पर्धेत 40 पेक्षा अधिक पदके मिळवलेल्या राहूरी येथील सखाहरी शांताराम बर्डे ह्या आदिवासी भिल्ल समाजाचे आहेत. 


राहूरी येथील सखाहरी शांताराम बर्डे या आदिवासी तरूणाने शरीरसौष्ठव स्पर्धेत 40 पेक्षा अधिक पदके व प्रमाणपत्रे मिळवली आहेत. एवढी पदके मिळवून देखील सदर तरुण आर्थिक संकटांशी सामना करत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब व  हलाखीची आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा त्यांना जात येत नाही. उदरनिर्वाहासाठी त्यांना नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. घरात आजारी आईच्या उपचाराचा खर्च तसेच शरीरसौष्ठव स्पर्धेत करीअर करण्यासाठी आर्थिक मदतीची खूपच गरज आहे. आपल्या अथांग प्रयत्नाने त्यांनी गरीब परिस्थितीवर मात करत 40 पेक्षा अधिक पदके मिळवली आहेत. त्याचबरोबर कला शाखेत उच्च शिक्षण घेतले आहे. शिक्षणाच्या जोरावर पोटापुरती नोकरी मिळेल अशी त्यांना आशा आहे.  


घरात वृद्ध आई, पत्नी दोघीही आजारी असतात व लहान मुलगी असा छोटा परिवार आहे. घरच्या भिंती पडक्या झाल्या आहेत. पावसामुळे घराच्या भिंती कधी कोसळून पडतील याचा नेम नाही, भिंती कोसळल्या तर पदके ही गाळली जातील अशी दयनीय अवस्था  आहे. अशा होतकरू व कष्टाळू आदिवासी भिल्ल समाजाच्या तरूणास सरकारी नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून सखाहरी शांताराम बर्डे यांच्या आजच्या परिस्थितीचा विचार करून व त्यांच्या कार्यकौशल्याचा, पदकांचा विचार करून तात्काळ सरकारी विभागात महाराष्ट्र शासनाने नोकरी द्यावी व शासकीय योजनांचाही लाभ द्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

शरीरसौष्ठव स्पर्धेत 40 पेक्षा अधिक पदके मिळवलेल्या सखाहरी बर्डे ह्या आदिवासी तरूणास शासकीय नोकरी व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी सुशिलकुमार पावरा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील गृहमंत्री, संदिपान भुमरे रोजगार मंत्री, धनंजय मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री, के.सी.पाडवी आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा