Breaking




मुंबई : रेल्वे युनियन चे कॉम्रेड टी. राजा यांचे दु:खद निधन !



मुंबई : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन चे कुर्ला, कलवा कारशेड चे कार्यकर्ते,  डोंबिवली येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते, तसेच वाहतूक जिल्हा सेक्रेटरी राहिलेले कॉम्रेड. टी. राजा यांचे आज सकाळी कॅन्सरने डोंबिवली येथे राहत्या घरी वयाच्या ७६ व्या वर्षी दु:खद निधन झाले. 


कॉम्रेड राजा यांचा १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपात सक्रिय सहभाग होता. दिवा, डोंबिवली, ठाकुर्ली मधील रेल्वे कामगारांशी त्यांचा जवळचा संबंध राहिला व युनियन बांधण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 


ते तमिळ भाषिक असुन सुद्धा ते मराठी भाषा अस्खलितपणे बोलायचे, लिहायचे तसेच त्यांचे मराठी, इंग्रजी वाचन दांडगे होते  उर्दू भाषेचाही त्यांचा अभ्यास होता. ठाणे जिल्ह्यातील किसान सभेच्या चळवळीतही ते कॉ. कृष्णा खोपकर यांच्या सोबत सहभागी होत असत. 


बेलापूरच्या कॉ. बी. टी. रणदिवे भवन येथे, " विळा- हातोड्याची प्रतिकृती त्यांनी स्वतः रेल्वे वर्कशॉप मध्ये तयार करून कॉ. खोपकरांना दिली व तेथे ती लावण्यात आली आहे. 


उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याणचे कॉम्रेड गांजरे, कॉ.उपाध्याय, कॉ. चार्ली, कॉ. प्रकाश जंगम, मुंबई मदनपुर्यातील अवामी इदारा  व रेल्वे युनियन चे नेते कॉम्रेड बशीर अन्सारी, रेल्वे इ. सी. बॅंकेचे संचालक कॉम्रेड बसंतलाल, युनियनचे नेते कॉम्रेड बुवा खंडागळे यांच्या बरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 


रेल्वे युनियन चे नेते कॉ. पी. आर. मेनन, राधाकृष्णन, व आताचे नॅशनल रेल्वे मजदूर युनियन चे नेते कॉ. वेणू नायर या सर्वांना त्यांनी युनियनच्या उभारणीत मोठी मदत झाली आहे.त्यांची मार्क्सवाद- लेनिनवादी तत्त्वज्ञानावर डोळस निष्ठा होती व ते कृतिशील कम्युनिस्ट कार्यकर्ते म्हणूनच जगले. त्यांच्या मागे पत्नी व मुलगा स्टॅलिन असा परिवार आहे.


"कॉ. टी. राजा पक्षाचे आणि रेल्वे युनियनचे एक असामान्य नेते होते. दोन्ही क्षेत्रांत ते कार्य करत असताना आमची अनेकदा भेट व्हायची. रेल्वे युनियनचे उत्तुंग पक्षनेते कॉ. पी. आर. मेनन आणि कॉ. सी. राधाकृष्णन त्यांच्या कार्याचा खूप आदर करत असत. कॉ. टी. राजा अत्यंत लढाऊ व निष्ठावंत बाण्याचे होते. त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यात पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे."


डॉ. अशोक ढवळे, कम्युनिस्ट नेते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा