Breaking
पुणे : प्रलंबित वनहक्क प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कार्यवाही करण्याची किरण लोहकरे यांची मागणीजुन्नर (पुणे) : वनहक्क कायदा २००६ अन्वये ग्रामस्तर, उपविभाग स्तर व जिल्हास्तरीय वनहक्क समित्यांकडे प्रलंबित दाव्यांची प्रक्रिया सुरळीत करणेसाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी विभागीय वनहक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, वनहक्क दाव्यांविषयी उपविभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी घेतली असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय समितीने त्यांच्याकडे उपविभागीय स्तरावरून प्राप्त झालेल्या दाव्यापैकी काही वनहक्क दावे मंजूर केलेले आहेत. तर उर्वरित सर्व वनहक्क दावे पुनर्विलोकनासाठी / त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पुन्हा उपविभागीय वनहक्क समितीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे कोणतेही वनहक्क दावे प्रलंबित नाहीत किंवा अमान्य केलेले नाहीत. उपविभागीय वनहक्क समितीने पुनर्विलोकनासाठी / त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हास्तरावरून प्राप्त झालेले वनहक्क दावे तपासून ते पुन्हा जिल्हा समितीकडे पाठविलेले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरीय समिती या वनहक्क दाव्यांबाबत निर्णय घेऊ शकत नाही. जोपर्यंत जिल्हास्तरीय समिती या वनहक्क दाव्यांचा बाबतचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत वनहक्क धारकांना विभागीय वनहक्क समितीकडे आपिल करण्याची संधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे विभागीय वनहक्क समितीचे अध्यक्ष या नात्याने वनहक्क दाव्यांची निर्णयप्रक्रिया सुरळीत होण्यासाठी उपविभागीय वनहक्क समिती व जिल्हास्तरीय वनहक्क समिती च्या बैठका आयोजित करून दावे निकाली काढणेबाबत संबंधित कार्यालयांना आपल्या स्तरावरून पत्रव्यवहार करावा, अशी मागणी केली आहे.


तसेच लोहकरे यांनी म्हटले आहे की जिल्हास्तरावर वनहक्क दावा मान्य झाल्यास वनहक्क धारकांना न्याय मिळेल व दावा अमान्य झाल्यास वनहक्क धारकांना विहित कालावधीत विभागीय वनहक्क समितीकडे आपिल करण्याची संधी उपलब्ध होईल . वनहक्क दाव्यांची सध्याची आकडेवारी जाणून घेण्याकरता विभागीय वनहक्क समितीच्या सर्व सदस्यांना आपल्या पुणे विभागातील तालुकानिहाय ग्रामसभा, उपविभागीयस्तर व जिल्हास्तरावरील प्राप्त वनहक्क दाव्यांची माहिती देखील मागितली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा