Breaking
बीडमध्ये सोयाबीनची विक्रमी पेरणीबीड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप पेरणीत आत्तापर्यंत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६९ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यातही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २ लाख १२ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबिनाने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे.


यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४६ हजार ४८ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत २९ जून अखेर जिल्ह्यात ५ लाख १५ हजार ६३ हेक्टरवर अर्थात सरासरीच्या तुलनेत खरिपाची ६९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात बीड ५८८४३, पाटोदा ५०८७१, आष्टी ५४९११, शिरूर कासार ४०२७३, माजलगाव ३४७५५, गेवराई ४९६५२, धारूर ३८०८०, वडवणी २२६१८, अंबाजोगाई ५३८२३, केज ७३२१५, तर परळीतील ३८०२२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.


यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबिनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९० हजार ७४८ हेक्टर आहे. त्या तुलनेत २ लाख १२ हजार १३३ हेक्‍टरवर अर्थात सरासरीच्या तुलनेत १११ टक्के क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी झाली. पाटोदा, धारूर, वडवणी, केज या तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत दीडपट व त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबिनच्या पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.


४७ हजार हेक्‍टरवर तूर


सोयाबीन पाठोपाठ जिल्ह्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४४७३४ हेक्टर आहे. त्या तुलनेत ४७ हजार ६८६ हेक्‍टरवर तुरीची पेरणी झाली आहे. मुगाची १३१०२ हेक्टरवर, उडदाची २९ हजार ६२२ हेक्टरवर, खरीप ज्वारीची २८६७ हेक्टरवर, बाजरीची ३१ हजार ५७३ हेक्‍टरवर, मक्याची ५ हजार १९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा