Breakingमोठी बातमी : राज्यातील 'या' भागात शाळा सुरू होणार, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी !मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ मध्ये राज्यातील कोव्हीड मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे  सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.


कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, कोरोनाकाळात बंद असलेले शाळेचे दरवाजे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनामुक्त भागात शाळा सुरू होणार आहे. या भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे सर्वाधिकार हे ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत.


ग्रामीण भागात कोविड - मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहे.शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या - टप्यात शाळेत बोलविण्यात येणार आहे.


कोविड संबंधी सर्व नियमांचे चे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ - २० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, हे कटाक्षाने पाळावे लागणार आहे.


शिक्षकांना गावातच राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी लागणार, शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांंचे पालन करावे लागणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा