Breaking
धक्कादायक : "MPSC मायाजाल आहे, यामध्ये पडू नका" म्हणत पुण्यात तरुणाची आत्महत्यापुणे : पुण्यातील स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. स्वप्निलने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो पासही झाला होता. मात्र, परीक्षा देऊनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे यात पडू नका. जमलं तर हे इतरांपर्यंत पोचवा, अनेक जीव वाचतील, असा उल्लेख करीत स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.


आत्महत्या केलेल्या स्वप्नीलने पत्राल लिहिलंय की, "प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत चाललंय. आत्मविश्वास तळाला जातोय आणि स्वतःवर शंका यायला सुरूवात झालीय", त्याची ही वाक्यं प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याने अधोरेखित करून ठेवायला हवं. भलेही तुम्ही एखाद्या स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकात महत्वाची ओळ हायलाईट करता आणि आठवत राहता, ते राहिलं तरी चालेल. पण, स्वप्नीलची ही वाक्यं पुन्हा पुन्हा लक्षात ठेवत रहा. कृत्रिम व्यवस्थेचा बळी ठरता आहात तुम्ही. स्वप्नांचं बाजारीकरण करून स्वतःची घरं भरणारे क्लासेसकर्ते आणि सरकारी नोकरी भरतीचं गाजर दाखवून वर्षोनुवर्षं ताटकळत ठेवणारी सरकारी व्यवस्था आता या मुलांच्या जीवावर उठलीय. आणि या स्पर्धा परिक्षेच्या मुलांनीही वास्तवतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या डोळ्यांवर अवास्तवतेच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनांचे चष्मे चढवून आपल्याच विश्वात रममाण झालेले आहेत. पण, जेव्हा एखादा हुशार मुलगा हा चष्मा काढतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, आपण बळी ठरलोय!


स्वप्नील लोणकर हा एमपीएससीची २०१९ ची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षापासून त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यामुळे तो तणावात होता. त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली होती. ती पूर्व परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. तरीही नोकरी मिळत नसल्याने अखेर स्वप्निलने आत्महत्येचे पाऊल उचलले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा