Breaking


समाजवादी नेते मधू वाणी यांचे निधन !


पुणे : पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ समाजवादी कामगार नेते मधु वाणी यांचे दुःखद निधन झाले.


पत्नी सुलोचनाताई वाणी यांचे निधन झाल्यानंतर गेले सहा महिने मधु वाणी आपला मुलगा मिलिंद याच्याकडे पाषाण या ठिकाणी राहत होते दुर्दैवाने त्यांचे 24 जून 2021 रोजी पुण्यामध्ये वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. मूळचे खानदेशातील वरणगाव या लहानशा गावात ते जन्मले व शालेय वयातच ते राष्ट्र सेवा दलात कार्यरत झाले. 1950 साली ते आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत आणि भूदान यात्रे सहभागी झाले होते. 1970 साली पुण्यातील जर्मन कंपनीतील नोकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यासाठी देण्याचे ठरवले आणि साप्ताहिक साधनांमध्ये काम करू लागले.

आणीबाणीच्या काळात त्यांना भूमिगत रहावे लागले. 1980 ते 1990 या दशकात ते कामगारांसाठीच्या लढ्यात सहभागी झाले आणि काही काळासाठी हिंद मजदूर सभेचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष झाले 'मुखवट्याच्या मागचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'हे त्यांचे पुस्तक खूप गाजले. सामाजिक आणि राजकीय विषयांवर काही मोजकीच पण अभ्यासपूर्ण पुस्तके लिहून त्यांनी वाचकांच्या मनात समाजवादी चिंतक अशी प्रतिमा निर्माण केली
विनायकराव कुलकर्णी, डॉक्टर बाबा आढाव, प्राध्यापक ग.प्र. प्रधान, भाई वैद्य यासारख्या निष्ठावंत आणि विचारवंत लोकांच्या बरोबर त्यांनी झोकून देऊन सामाजिक आणि राजकीय कार्य केले. 

पिंपरी-चिंचवड मध्ये समाजवादी विचारवंत, लेखक आणि नेते असा लौकिक त्यांनी त्यांच्या कार्यातून निर्माण केला होता. त्यांच्या दुःखद निधनाने पिंपरी-चिंचवड मध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांची सदैव उणीव भासत राहील. पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी कथामाला, समाजवादी अध्यापक सभा, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यामार्फत मधु वाणी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा