Breakingभारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा चांदवड तालुका यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदनचांदवड (सुनिल सोनवणे) : प्रधानमंत्री पिकविमा योजनेला अनुसरुन सन २०२०-२१ या सालातील चांदवड तालुक्यातील ५३३१ शेतकऱ्यांना त्वरीत पिकविम्याचा लाभ मिळवून देणेबाबत उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.


केंद्र सरकारने अतिवृष्टी, अवर्षण, दुष्काळ, कीड रोग इ. कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु केली आहे. या योजनेत केंद्र सरकार ४० %, राज्य सरकार ४० % व शेतकरी २० % अशी विम्याची रक्कम संबंधीत कंपनीला भरीत असतात. या योजनेला अनुसरुन सन २०२०-२१ या वर्षाकरीता शासनाने नेमून दिलेल्या भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे चांदवड तालुक्यातील १३,७४९ शेतकऱ्यांनी बाजरी, मका, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, उडीद, मूग, कांदा या पिकांचा विमा खरीप हंगामात संबंधीत कंपनीकडे भरला होता.


साधारणत: ७६६८ हेक्टर क्षेत्राचे संबंधाने हा विमा शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कोरानाची भीषणता असताना आर्थिक परिस्थिती नसतांना देखील भरला होता, असे असतांना गेल्या वर्षी अतिवृष्टी व लष्करी अळीमुळे विमा भरलेल्या पिकांचे ८० ते ९० % नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अशा परिस्थितीत खरीप पिकांचे पूर्णत: नुकसान झाले होते. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानाची दखल घेत महसूली अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करुन तसे अनुदानही थोड्याफार प्रमाणात दिले होते, असे असतांना शेतकऱ्यांनी भारती एक्सा जनरल इन्शून्स कंपनीकडे विमा भरलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे तक्रारी केल्या होत्या. त्याचबरोबर कृषी खात्याकडे देखील विमा भरपाई मिळण्यासाठी तक्रारी केल्या होत्या.


तक्रारी केल्यानंतर केवळ ८४१८ शेतकऱ्यांना कंपनीने विम्याची नुकसानभरपाई दिली. व उर्वरीत ५३३१ शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने संबंधीत पिकाचे नुकसान होऊनही विम्याला अनुसरुन संबंधीत पिकाची नुकसानभरपाई देणे नाकारले, वास्तविक तालुक्यातील प्रत्येक गावातील विमाधारक शेतकऱ्याचे नुकसान झालेले होते. संबंधीत कंपनीने फक्त हेतुपुरस्करपणे ठराविक शेतकऱ्यांनाच प्रत्येक गावात नुकसानभरपाई दिली. वास्तविक एकाच बांधालगतच्या एका शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळते व दुसरा लगतचा शेतमालक विमा भरुनही त्याला नुकसानभरपाई कंपनीने नाकारली हे कंपनीचे वागणे दुटप्पीपणाचे व ते विमा भरलेल्या शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. मुळात शेतकऱ्यांना शेतमालाची अनिश्चीत उत्पन्नाची नुकसानभरपाई सामुहिक स्वरुपात मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु केलेली आहे, असे असतांना संबंधीत कंपनीने लोकलाइज, वैयक्तीक पूर्व कल्पना, ७२ तासात तक्रारी, प्राणीहल्ला लागू नाही इ. कारणे दाखवत अटी व शर्ती व नियमांचे चुकीचे निकष लावून ५३३१ शेतकऱ्यांना विमा देण्याचे नाकारले.


वास्तविक पाहता शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या नंबरवर तात्काळ फोनही केले, कृषी अधिकाऱ्यांनाही कळविलेले होते. मुळात खेड्यांमध्ये वीज व इंटरनेटचा प्रॉब्लेम असताना व कोरोनाची परिस्थिती असतांना तालुक्यातील संबंधीत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही विमा कंपनीचा प्रतिनिधी वेळेत आलाच नाही. वेळेनंतर जो कोणी आला त्याने ठराविक लोकांचे सातबारा उतारे व पावत्या जमा केल्या व इतर शेतकऱ्यांना विमा मिळू नये म्हणून इतर शेतकऱ्यांकडे जाण्याची देखील तसदी संबंधीत प्रतिनिधीने घेतली नाही. हे सर्व रेकॉर्ड प्रत्येक शेतकऱ्याचे संबंधीत कंपनीकडे ऑनलाइन होतेच त्याबरोबर कृषी विभागाकडे देखील होते. पण हेतुपुरस्करपणे संबंधीत कंपनीने जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळू नये, म्हणून शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक केली आहे व संबंधीत कंपनीने नियमांची पायमल्ली केलेली आहे. किसान सभेने कृषी अधिकारी व विमा कंपनीकडे वेळोवेळी संबंधीत उर्वरीत लोकांना तात्काळ विम्याचा लाभ द्यावा म्हणून चौकशी केली होती मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.


महसूल विभागाने नुकसानीनंतर केलेल्या पाहणीला अनुसरुन व कंपनीने विमा देण्याच्या संबंधाने चुकीचे निकष लावले. विमा कंपनीने त्यांना दिलेल्या मार्गदर्शक तत्व सूचना, आदेश, संबंधीत शासन निर्णय इ.चे उल्लंघन केलेले आहे. म्हणून संबंधीत विमा कंपनीची महाराष्ट्र शासनाने सखोल चौकशी करुन त्यांच्या रेकॉर्डची पाहणी करुन कंपनीने नाकारलेल्या कारणांची कारणमिमांसा याची पडताळणी करुन चांदवड तालुक्यातील उर्वरीत शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ द्यावा व संबंधीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तीव्र आंदोलन छेडेल असे निवेदनात म्हटले आहे.


यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सेक्रेटरी अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, किसान सभा जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे, किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष सुकदेव केदारे, रंगनाथ जिरे, अण्णा जिरे, नामा मोरे आदी नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा