Breakingपुणे : पूरप्रवण व दरडप्रवण गावामध्ये यंत्रणा सतर्क ठेवावी - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख


पुणे / आनंदा कांबळे : पूरप्रवण व दरडप्रवण गावांमध्ये यंत्रणांनी  सतर्क राहून काम करावे, तालुका व गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी मुख्यालयी राहून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळोवेळी प्रशासनाला याबाबत माहिती देतानाच बाधित गावातील नागरिकांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या. 


जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील पूरस्थिती, पूरप्रवण गावे, दरडप्रवण गावे, व झालेल्या नुकसानीबाबत तालुकास्तरीय यंत्रणेसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

तालुकानिहाय पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पूरप्रवण व दरडप्रवण गावांमध्ये यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपत्तीच्या कालावधीत काम करताना यंत्रणेमध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. तालुकास्तरावरील प्रशासकीय यंत्रणेसोबतच व  गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक तसेच यंत्रणेतील सर्वांनी मुख्यालयी थांबणे गरजेचे असून गावातील परिस्थितीबाबत सातत्याने प्रशासनाला माहिती दयावी. नियंत्रण कक्ष दक्षतेने कार्यान्वित करा तसेच पाऊस कमी झाल्यावर नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करावेत. शासकीय मालमत्तेच्या प्राथमिक नुकसानीचे अहवाल सबंधित यंत्रणेने सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. पूरबाधित नागरिकांचे स्थलांतरण करून स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. तसेच पूरस्थितीमुळे तसेच दरड कोसळल्यामुळे महामार्ग बंद राहणार नाहीत याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने दक्षता घ्यावी तसेच शहरालगतच्या प्रकल्पातील पाणीसाठा व विसर्ग याबाबत सातत्याने नियंत्रण व समन्वय ठेवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.

आपत्तीच्या कालावधीत काम करताना यंत्रणेतील समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले,  पुणे जिल्हयातील पूरस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क राहावे लागेल. पूरप्रवण व दरडप्रवण गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे तसेच पर्यटनस्थळी तसेच धबधब्याच्या ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, पुणे जिल्हयातील सर्व महामार्ग सुरळित सुरू राहतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही गावपातळीवर आपत्तीच्या कालावधीत काम करताना काय काळजी घ्यावी, याबाबतच्या सूचना दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व उपविभागीय प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस यंत्रणेतील अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी सबंधित तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा