Breakingज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं निधन !


मुंबई: 'वाचणाऱ्याची रोजनिशी' लिहून वाचकांशी थेट संवाद साधणारे मराठीतील प्रख्यात कवी, संपादक व मार्क्सवादी चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. राहत्या घरी झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काळसेकर यांच्या निधनामुळे नवोदित लेखक, कवींचा हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.  वाचणाऱ्याची रोजनिशी' या पुस्तकाला  साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला होता.


सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी जन्मलेल्या काळसेकर यांचं शालेय शिक्षण सिंधुदुर्गातच झालं. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी मासिक ज्ञानदूत व टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी नोकरी केली. 

काळसेकर यांच्या वाङ्‌मयीन कारकिर्दीची सुरुवात काव्य लेखनानं झाली. सुरुवातीला महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवाकाळ, मराठा यांसारख्या वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विविध वाङ्‌मयीन नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला. या कविता संग्रहानं त्यांना साहित्य वर्तुळात ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. कविता, अनुवाद, गद्य असे वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळले. 'वाचणाऱ्याची रोजनिशी' या त्यांच्या पुस्तकाला २०१४ सालच्या 'साहित्य अकादमी' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.  लोकवाड्मय वृत्त चे २० वर्ष पेक्षा जास्त काळ संपादक होते. 

लोकवाड्मय प्रकाशन गृह च्या जडणघडण मध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावली. साहित्यिक प्रगतशील चळवळीत महत्वाची भूमिका घेणारे प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र चे अद्यक्ष ही होते. कवी , लेखक , साहित्यिक चळवळी शी जवळचा संबंध त्यांचा होता. कवी नारायण सुर्वे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सोबत साहित्य चळवळीत काम केले. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन आयोजन मध्ये महत्वाची भूमिका घेतली. ते कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन चे अध्यक्ष म्हणून धुरा ही सांभाळली होती. लेखक आणि वाचकातला दुवा हरपला आहे. 

"नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय जोडले गेले होते. परिवर्तनवादी चळवळी चा मार्गदर्शक आज हरपला आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली लाल सलाम, अशी भावना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य कॉम्रेड राजू देसले यांनी व्यक्त केली आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा