Breaking


एकलहरे येथील खून प्रकरणातील आरोपीला नारायणगाव शिवारातून अटक, दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश !


नारायणगाव : एकलहरे शिवारातील फकिरवाडी येथून दुचाकीवर 'टिबलशीट' जात असतांना ओंकार उर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याचा डोक्यात गोळ्या झाडून खून केल्या प्रकरणी 'लोकल क्राईम ब्रँच, मंचर व नारायणगाव पोलिसांनी नारायणगाव शिवरातून एकाला अटक केली असून, अन्य दोघे अल्पवयीन आरोपींना मंचर येथून ताब्यात घेतले असल्याची अधिकृत माहिती पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.


याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात गुन्हेगार आपलं वर्चस्व गाजवू पहात आहे का ? हे पोलिसांपुढे एक आव्हान होते. मात्र पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी हे आव्हानाशी यशस्वी झुंज देत आपल्या सहकार्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट लोकल क्राईम ब्रँच मंचर आणि नारायणगाव पोलिस यांनी संयुक्त कारवाई करीत आरोपींना अवघ्या चोवीस तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले. 

नारायणगाव शिवारातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव भागात या गुन्ह्यातील आरोपी चैतन्य सत्यवान गायकवाड (वय १९,रा.चाकण,ता.खेड) याच्यासह मंचर येथील दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत ओंकार उर्फ राण्या याचा भाऊ मयूर अण्णासाहेब बाणखेले यांनी याबाबत मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


ओंकार बाणखेले याच्या डोक्यात पिस्तूलातून गोळ्या झाडून एकलहरे सुल्तानपूर रस्त्यावर फकिरवाडी शिवारात खून करण्यात आला होता. ओंकार हा प्रकाश पगारे, वसंत डोके या मित्रांसोबत सुल्तानपूरकडे दुचाकीवरून जात होता. पगारे हा गाडी चालवत होता.तर मध्ये बसला होता. पगारे हा फकिरवाडी येथून जात असतांना पाठीमागून तिघेजण दुचाकीवरून आले. त्यापैकी एकाने तीन फूट अंतरावरून ओंकारच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या अनो तेथून पसार झाले. यात ओंकारचा मृत्यू झाला. 

मंचर पोलिसांनी लागलीच घटनास्थळाची पहाणी केली तेव्हा पगारे हा पूर्ण नशेत होता. त्यामुळे त्याला काहीही माहिती पोलिसांना देता आली नाही. मात्र मंचर पोलिसांनी तातडीने सूत्र हलविली सात महिन्यांपूर्वी नारायणगाव येथील कोल्हेमळा चौकातील 'लँड ब्रोकर' संग्राम घोडेकर याच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यातील आरोपींना शोधण्यात पोलिसांना सीसीटीव्ही पुटेज ची मदत नारायणगाव पोलिसांनी घेतली होती. त्याच धर्तीवर मंचर पोलिसांनी रस्त्यातील सीसीटीव्ही पुटेज ची पडताळणी केली. सीसीटीव्ही पुटेज मध्ये पोलिसांना तीन आरोपी दिसले. त्यात गोळीबार करणारे आरोपी असल्याची पक्की खात्री पोलिसांना झाली. त्यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधून आरोपींची ओळख पटल्याचेही पोलिसांनी वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर येथून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले तर चैतन्य गायकवाड याला नारायणगाव येथून उचलले. मात्र या प्रकरणातील मुख्यसूत्रधार पसार झाल्याने पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे.

मंचर येथून ताब्यात घेतलेले अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, चैतन्य गायकवाड याचे वडील सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. ओंकार उर्फ राण्या बाणखेलेवर खुनासह इतर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. ओंकार बाणखेले याचा खून वर्चस्व वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असला तरी मोबाईलवर स्टेटस ठेवून ओंकार या शिवारात वर्चस्व गाजवू पहात असल्यानेच झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे !

संपादन - रवींद्र कोल्हे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा