Breaking


SFI चे प्रतिकात्मक शिकवणी वर्ग भरवून केंद्र व राज्य सरकार विरोधात आंदोलन


सोलापूर : एसएफआय सोलापूर जिल्हा कमिटी च्या वतीने आज प्रतिकात्मक शिकवणी वर्ग भरवून केंद्र व राज्य सरकार विरोधात आंदोलन आंदोलन केले.


१२ ऑगस्ट हा भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस आहे. याच दिवशी १९३६ साली भारतातील पहिल्या संघटीत विद्यार्थी आंदोलनाची सुरुवात झाली होती. त्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका निभावली. स्वातंत्र्यानंतर बदललेल्या परिस्थितीत सार्वजनिक शिक्षण वाचविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर त्याने कार्य केले. ते आजतागायत सुरु आहे. एसएफआय त्याच आंदोलनाचा एक भाग आहे. या महत्त्वपूर्ण १२ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी देशभरात रस्त्यावर उतरले असे जिल्हा सचिव मलेशम कारमपुरी म्हणाले.


कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून राज्यातील सर्वच जनता त्रस्त आहे. या महामारीचा अत्यंत वाईट असा परिणाम शिक्षण क्षेत्राला भोगावे लागले; अद्यापही भोगावे लागत आहे. मागील वर्षी सर्व विद्यार्थ्यांना एका सेमिस्टरमध्ये सवलत देऊन पास करण्यात आले. परंतु पुढील वर्षात त्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. म्हणजेच विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. महामारीत पर्याय म्हणून ऑनलाईन शिकवणी वर्ग चालू करण्यात आले. परंतु त्यात सर्वच विद्यार्थी सामावून घेतले गेले नाहीत. नेटवर्क समस्या, ग्रामीण-दुर्गम भागातील मुलभूत सोई-सुविधांचा अभाव, मोबाईल खरेदी व रिचार्जसाठी पालकांकडे पैसे नसणे, विद्यार्थ्याची स्क्रीनसमोर बसण्याची मर्यादा आदी प्रकारचे अडथळे समोर आले. त्यात राज्य सरकारकडून कोणतेही प्रभावी कार्य झालेले नाही. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात सामावून घेणे ही सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार ते करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे म्हणत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने राज्यभरात निषेध आंदोलन केले.


एसएफआय सोलापूर जिल्हा कमिटी च्या वतीने आज प्रतिकात्मक शिकवणी वर्ग भरवून आंदोलन करण्यात आले. तसेच शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी एसएफआय चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, सहसचिव शामसुंदर आडम, स.मं.सदस्य राहुल भैसे, जि.क.सदस्य पुनम गायकवाड, प्रशांत आडम, प्रभुदेव भंडारे, गणेश भोईटे रोहित सावळगी, तौसिद कोरबू, श्रुतिका बल्ला इ. कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी होते. 


■ एसएफआयच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या : 


१. मागील व चालू वर्षाचे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क व वसतिगृह शुल्क माफ करा. 


२. कोविडचे सर्व नियम पाळून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्था सुरु करा. विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध करा. डिजिटल विभाजन थांबवा. 


३. राज्यातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती, फेलोशीप, स्वाधार योजनेची रक्कम त्वरित वितरीत करा. 


४. १०वी आणि १२वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रवेशाची संपूर्ण व्यवस्था करा. 


५. एमपीएससीच्या रखडलेल्या नियुक्त्या व भरती प्रकिया त्वरित पूर्ण करा. सरकारी विभागातील सर्व नोकरभरती एमपीएससी मार्फत करा. 


६. दिल्लीत ९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून ठार मारले गेले, या घटनेचा एसएफआय तीव्र निषेध करते आणि महिला अत्याचार प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा करण्याची मागणी करते. राज्यात अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा घटनांना कायमचा आळा घालण्यात यावा.


७. विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांना मोफत लस दया व लसीकरण वेगाने करा. 


८. संशोधक विद्यार्थ्यांच्या नॉन-नेट फेलोशीपची समस्या मार्गी लावा. राजीव गांधी फेलोशीपसाठी त्वरित आर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करा. 


९. डीबीटी बंद करून आदिवासी विद्यार्थी वसतिगृहासाठी आधीची पद्धती पूर्ववत सुरू करा. आश्रमशाळांच्या समस्या मार्गी लावा.


१०. राज्यातील ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यांसाठी घोषित सरकारी वसतिगृहे त्वरित सुरु करा. 


११. राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया त्वरित राबवा.


१२. नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या शाळा,महाविद्यालयांवर कठोर कारवाई करा.


१३. आरोग्य विभागातील पदांसाठी २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना यावेळी विना-शुल्क अर्ज करण्याची संधी द्या. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या दिवशी परीक्षांचे आयोजन करा.


१४. महाज्योती संस्थेकडून संशोधक विद्यार्थ्यांना दिली जाणाऱ्या फेलोशीपमध्ये वाढ करा. तसेच फेलोशीप विद्यार्थी कोटा वाढवा.


१५. कोविड महामारीमुळे संशोधक विद्यार्थ्यांना प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट करण्याचे शुल्क माफ करा.


१६. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी ग्रामीण भागात बससेवा सुरु करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा