Breaking


सदोष मोबाईल परत करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अकोलेत आंदोलन


अकोले : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने वितरित करण्यात आलेले मोबाईल सदोष असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत, असा आरोप करत शासनाने निर्धारित केलेले कोणतेही काम या मोबाईलच्या साह्याने करणे अशक्य आहे. सिटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेने हे मोबाईल राज्य सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार अकोले तालुक्यामधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढत, वाजत गाजत हे सदोष मोबाइल राज्य सरकारला परत केले. 



सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात यावेळी शेकडो अंगणवाडी कर्मचारी एकत्र आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयापासून भव्य मोर्चा काढत या सदोष मोबाईलची अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वाजत-गाजत धिंड काढली. शहरातून मोर्चाने अंगणवाडी कर्मचारी पंचायत समिती कार्यालयात धडकले. जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा धिक्कार करण्यात आला.


अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सदोष मोबाईल देणाऱ्या बालकल्याण विभागाचाही यावेळी निषेध करण्यात आला. सदोष मोबाईल परत घ्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा टाकणे बंद करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत कायम करा, किमान पंधरा हजार रूपये हक्काचे वेतन द्या, डाटा एंट्रीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे गणेश ताजणे, आशा घोलप, रंजना पऱ्हाड, अक्काबाई देशमुख, माधुरी वाकचौरे, मंगला शिरसाठ, निर्मला मांगे, आशा पिचड, आशा कांडेकर, रोशनी शिंगोटे, मालती गोसावी, इंदुमती चांदगीर आदींनी केले. किसान सभेचे डॉ. अजित नवले व सिटू कामगार संघटनेच्या जुबेदा मनियार, आराधना बोराडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे आदींनी मोर्चास पाठिंबा व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा