Breaking


आशाताई बुचके यांचा भाजपात जाहीर प्रवेश !


मुंबई / रवींद्र कोल्हे : नारायणगाव गटातील शिवसेना जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी आज गुरुवार (दि.१९ ऑगस्ट ) रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. 


आशाताई बुचके यांची राजकीय कारकीर्द मुंबईतूनच सुरू झाली. मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून त्या प्रथम भाजप च्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर जुन्नरची वाघीण म्हणून तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. त्यांना प्रथम येणेरे गटातून उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत बुचके यांनी जिल्हा परिषदेच्या चारही निवडणुका लढविल्या आणि विजय मिळविला. आज जरी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असला तरी त्या स्वगृही परतल्या असंच म्हणावं लागेल.

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे विचलित न होता आपला लढवय्या बाणा शाबीत ठेवून बुचके यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार सोनवणे यांना आव्हान दिले. पक्षनेतृत्वाने बंडखोर उमेदवार म्हणून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली.

आज पक्ष प्रवेश झाल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशाताई बुचके विधानसभेच्या तीन निवडणुका लढल्या. मात्र तीनही वेळेला घात झाल्याने त्या निवडून येऊ शकल्या नाहीत. मात्र आता आम्हाला १००% विश्वास आहे. की २०२४ मध्ये जुन्नरचा आमदार भारतीय जनता पार्टीचा असेल आणि आशाताई बुचके असतील.असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, सुनील कर्जतकर, हाजी आरफत शेख यांच्यासह बुचके यांचे कार्यकर्ते नारायणगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष माळवदकर, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा करीत होतो. महिला असूनही मुंबईत प्रस्थापित असतांनाही बुचके आपल्या मूळ गावी म्हणजे जुन्नर तालुक्यात गेल्या. तिथे चार वेळा गेववेगळ्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली आणि सदस्या म्हणून निवडूनही आल्या आहेत. त्यांना शिवसेनेत न्याय मिळालाच नाही. भारतीय जनता पक्षात त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय तसेच सन्मानही दिला जाईल. जुन्नर मधून तीन वेळा विधानसभा निवडणुक लढविली त्यात त्यांना यश आले नाही. परंतू आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना आमदार झालेलं बघायचं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा