Breaking


जागतिक आदिवासी दिनाचा भाजप खासदारांने केला विरोध !


भाजप खासदारांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी


रत्नागिरी : जागतिक आदिवासी दिनाचा विरोध करणारे भारतीय जनता पार्टीचे बडवानी (मध्य प्रदेश) लोकसभा क्षेत्राचे खासदार गजेंद्र सिंह पटेल यांच्यावर कडक कारवाई करून लोकसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक सुशीलकुमार पावरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोवींद व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, जागतिक आदिवासी दिनाचा विरोध करणारे भाजपाचे खासदार गजेंद्र सिंह पटेल यांचा संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करतो. संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) १९९३ साली पर्यावरण संवर्धन, आदिवासी समाज व संस्कृतीच्या रक्षणार्थ ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. तेव्हापासून जगभरात विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र असे असतांना मध्य प्रदेश राज्यातील बडवानी या आदिवासी लोकसभा क्षेत्राचे भाजपाचे खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी जागतिक आदिवासी दिनाला विदेशी एजेंडा सांगून देशभरातील आदिवासी समाजाचा अपमान केलेला आहे. त्यानुषंगाने या खासदारांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करून त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे. अशी मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.


सुशीलकुमार पावरा यांनी म्हटले आहे की, जागतिक आदिवासी दिनाला भाजपाचे खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी विरोध दर्शवून एक प्रकारे जागतिक संघटना युनो आणि भारतातील आदिवासी समाजाचा अपमान केलेला आहे. तसेच आदिवासी समाजावर विशिष्ट विचारधारा लादण्याची त्यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय आहे. त्यांची ही प्रतिक्रिया आदिवासी विरोधी असून त्यांचा बोलविता धनी कोण? याचाही शोध घेणे गरजेचे आहे. देशभरातील राजकीय पार्टीत केवळ भारतीय जनता पार्टीची आदिवासी विरोधी भूमिका सातत्याने दिसून येते. ही पार्टी एवढा आदिवासींचा द्वेष का करते? भाजपाचे केंद्र सरकार व भाजपाचे सरकार असलेल्या राज्यात आदिवासी समाजावर अन्याय, अत्याचार वाढलेले आहेत. त्यातच खासदार गजेंद्र पटेल यांचे वक्तव्य खूप काही सांगून जाते. त्यामुळे खा. पटेल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी बिरसा फायटर्सचे संस्थापक सुशीलकुमार पावरा यांनी राष्ट्रपती व लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा