Breaking


कोविड -१९ अंतर्गत आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे – एस.एफ.आय


घोडेगाव,(दि.१३) : कोविड -१९ अंतर्गत आरोग्य सेवेत भरती केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत किंवा NRHM मध्ये समावेश करून घेण्यात यावे. अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) या विद्यार्थी संघटनेने मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


या निवेदनात संघटनेने म्हटलं आहे कि, ‘जगाच्या पाठीवर आलेल्या कोरोना महामारीमध्ये ज्या कोरोना योध्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत काम केले आहे व देशाच्या, महाराष्ट्राच्या , जिल्ह्याच्या, तालुक्याच्या हितासाठी रुग्णसेवा देऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी काम केले आहे.  अश्या सर्व कोरोना काळात भरती केलेल्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत किंवा NRHM मध्ये समावेश करून घेण्यात यावे. कोरोना काळात या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून आपली भूमिका निभावताना आई-वडील, लहान मुले व तसेच कुटुंबाची काळजी न करता सर्व प्रकारची सेवा कोरोना योद्धा म्हणून दिवस-रात्र अविरत सेवा दिली आहे. घरातील व्यक्तींचा विरोध पत्करून व त्यांच्या आरोग्याची काळजी न करता दिल्या गेलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून, अपुऱ्या सुरक्षा यंत्रणेशिवाय कोरोना महामारीच्या प्रचंड अशा उद्रेक सदृश्य परिस्थितीत सेवा दिली आहे. या कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायम सेवेत किंवा NRHM मध्ये सामावून न घेतल्यास एस.एफ.आय. लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे राज्यव्यापी आंदोलन करेल याची दखल घ्यावी.’ असे या निवेदनात म्हटले आहे.


यावेळी तालुक्याचे नायब तहसीलदार एस.बी.गवारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. तसेच ईमेल द्वारे जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुका सचिव समीर गारे, माजी अध्यक्ष महेश गाडेकर व अवसरी कोविड सेंटर मधील कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा