Breaking
दहीहंडी उत्सवाला यंदाही परवानगी नाहीच, पहा मुख्यमंत्री काय म्हणाले !


मुंबई : दहीहंडी उत्सवाला यंदाही परवानगी नाहीच. मुख्यमंत्री म्हणाले आधी कोरोनाला हद्दपार करु मगच सण, वार साजरे करु. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची आज बैठक पार पडली.


कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील दहीहंडी उत्सव नेहमीच्या जल्लोषात होणार नाही. राज्यातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत आज झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडीवरील निर्बंध कायम ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत. मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी मुंबई, ठाण्यासोबतच राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. या वर्षी छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी केली जात होती. तसेच जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली. सर्व गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करुन सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल असेही समन्वय समितीकडून सरकारला सांगण्यात आले होते.

दहीहंडी साजरी केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे टास्क फोर्सने सांगितले असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवणार आहोत. आपण मानवता दाखवू आणि सर्वात आधी कोरोनाला हद्दपार करू, असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.' 

यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी का देऊ शकत नाही हे समन्वय समितीच्या सदस्यांना स्पष्ट केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा