Breaking
पीक विम्यासाठी शेतकरी धडकणार पुण्यातील कृषी आयुक्तालयावर


परळी (अशोक शेरकर) : २०२० चा पिक विमा मंजुर करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेचा सोमवारी (ता.३०) पुणे येथील कृषी आयुक्तच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कॉ. अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


बीड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी करोडो रूपये २०२० च्या पिक विम्यापोटी अग्रीकल्चरल ईन्शुरन्स कंपनीकडे भरलेले आहेत. सप्टेंबर/ऑक्टोंबर २०२० मध्ये अतीवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. महसुल विभागानी नुकसानीचे पंचनामे करून शासनास अहवाल दिला होता. त्या अहवालामुळेच शेतकऱ्यांना पिक नुकसानीचे अनुदान मिळालेले आहेत. बीड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सादर केलेल्या २१ हजार शेतकऱ्यांना १३ कोटीचा पिक विमा मंजुर झालेला आहे. तरीही बीड जिल्ह्यातील लाखो शेतकरी पिक विम्या पासुन वंचित आहेत.


२०२० च्या खरीप हंगामात अतीवृष्टीमुळे झालेल्या सर्व पिक नुकसानीचे शासनाच्या महसुल विभागाने केलेले पिक पंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा देण्यात यावा. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी शर्तीचा फेरविचार करून त्या वगळुन ही योजना शेतकऱ्यांना झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळण्यास सुलभ करावी या दोन मागण्यांसाठी सोमवारी (ता.३०) राज्याचे कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे कॉ. पी. एस. घाडगे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन लांब, कॉ. बालासाहेब कडभाने, काशिनाथ सिरसाट, सुभाष डाके यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा