Breaking


विशेष लेख : कौशल्यापेक्षा तिच्या कपड्यांना महत्व देणे कितपत योग्य


काही दिवसांपूर्वी मैत्रिणीला भेटण्यासाठी मी तिच्या घरी गेले होते. गेटच्या आत अंगणात बसून आमच्या छान गप्पा सुरू असतानाच काही पुरुष मंडळी बाहेरील कट्ट्यावर येऊन बसली. त्यांची चर्चा आम्हाला ऐकू येत होती. पूर्वी तिथे कुणी एक सतरा - अठरा वर्षाची मुलगी आणि तिची आई राहत होती. तिला वडील नसावेत असा अंदाज त्यांच्या बोलण्यातून येत होता. शॉर्ट्स घालूनच ती मुलगी नेहमी बाहेर खेळण्यासाठी तर कधी शतपावली करण्यासाठी येत असे. त्यावर त्यातील एक जण म्हणाला की, इथे सुशिक्षित कुटुंब राहतात, घरात तरुण मुल आहेत. मुलींनी अशा प्रकारची कपडे घालून फिरणे ही चांगली लक्षण नाहीत. मुलींना ते शोभत नाही. पण याच सुशिक्षित मंडळींनी मात्र चारचौघात बसून इतरांच्या मुलींच्या कपड्यांवर चर्चा करण शोभणारा आहे का ? मुलींनी कशा प्रकारचे कपडे घालावेत यावर नेहमीच चर्चा घडवून आणली जाते. एवढ्यावरच न थांबता तिच्या कपड्यांचा संबंध थेट तिच्या चारित्र्याशी जोडला जातो. पुरुषांना मात्र वाटेल ते कपडे घालून गावभर फिरण्याची मुभा असते. थोड्या वेळातच मी तिथून निघाले. बाहेर येऊन या मंडळींकडे जरा नजर टाकावी म्हटलं तर काय? त्यातील बरीचशी मंडळी बरमूडा आणि बनियन घालून बसलेली दिसली. मुलींनी कशा प्रकारचे कपडे घालावेत याचा ठेका घेऊन बसलेली ही मंडळी स्वतः अंगभर कपडे घालून बसलेली असावीत असा माझा समज होता. त्यांच्या बुद्धीची मला कीव आली आणि तेथून मी सरळ घरचा रस्ता धरला. हे सांगण्याचे कारण की, वरील घटना या फक्त गल्लीत, गावात, शहरातच चर्चिले जातात अस नाही तर....


सध्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू असल्याने रोजच्या अपडेट्स सोशल मीडिया आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचण्यात येतात. काही दिवसांपूर्वीच टोकियो ऑलिम्पिकमधील जर्मनीच्या महिला जिम्नॅस्टसने त्यांच्या खेळातील पोशाखा संदर्भात घेतलेल्या निर्णयाची बातमी माझ्या वाचनात आली. या महिला खेळाडूंनी आपला नेहमीचा "लियोटार्ड" म्हणजे जांघ्यापर्यंतचा संपूर्ण पाय उघडे ठेवणारा पोशाख घालण्याचे नाकारून "युनिटार्ड" म्हणजे संपूर्ण अंग झाकून घेणारा पायाच्या घोट्यापर्यंतचा पोशाख घातला. जर्मन महिला खेळाडूंच्या या छोट्याशा कृतीमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून महिला खेळाडूंच्या पोषाखाबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. या महिलांच्या कृतीला क्रांतिकारी ठरवण्यामागचे कारण काय तर गेल्या अनेक वर्षांपासून महिला खेळाडू लियोटार्डच वापरत आल्या आहेत म्हणून जर्मन महिला खेळाडूंनी युनिटार्ड वापरणं हे मोठे पाऊल समजले जात आहे. 


त्यावर जर्मन जिम्नॅस्टस एलिझाबेथ साईटस चे म्हणणे आहे की, " महिला खेळाडूंना ज्या पोशाखामध्ये सुटसुटीत आणि सोयीचं वाटेल तो पोशाख निवडण्याचा अधिकार असला पाहिजे. हा पोशाख म्हणजे जिमनॅस्टिकमधील लैंगिकतेच्या विरोधातील एक पाऊल आहे. याचाच अर्थ स्वतःला सोयीस्कर वाटेल त्याच कपड्यांमध्ये स्वतःच्या खेळाला सौंदर्यपूर्ण रुपात सादर करणे होय."


बऱ्याचदा स्त्री आणि पुरुष जिमनॅस्टस यांच्या खेळाचे स्वरूप सारखे असते तरीही पुरुषांना घालण्यासाठी संपूर्ण पाय झाकणारा व सुटसुटीत असा यूनिटार्ड असतो तर महिलांना मात्र युनिटार्ड नसून लियोटार्ड असतो. फक्त धार्मिक कारणांमुळे पोशाख निवडीचे स्वातंत्र्य महिलांना असते. महिला जिमनॅस्टस घालतात तो लियोटार्ड नावाचा पोशाख फार छोटा असतो. सरावाच्या वेळी होणाऱ्या अंगाच्या अगणित हलचालींमुळे कपडे सरकले जाण्याची शक्यता असते त्याबरोबर मासिक पाळीच्या काळात अशा प्रकारच्या  कपड्यांमध्ये खेळणे महिलांसाठी गैरसोयीचे देखील होऊ शकते. परंतु येथील पुरुषसत्ताक मानसिकतेच्या समाजाला महिलांचे खेळ अधिक आकर्षक करायचे असल्याने खेळासाठी पोशाख निवडीचा त्यांचा अधिकार नाकारला जातो. एवढ्यावरच न थांबता या खेळांचे चित्रण करणारी माध्यमही ज्याप्रकारे व्हिडिओ, फोटोज् प्रदर्शित करतात त्यामध्ये महिला खेळाडूंच्या कौशल्यापेक्षा त्यांच्या आकर्षक दिसण्याकडे जास्त लक्ष वेधले जाते. आशा वार्तांकनामुळे त्या खेळाडूला काय वाटतं असेल याचा विचार केला जात नाही


जर्मन महिला जिम्नॅस्टिक सारा वोसने दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते , " आम्ही पाय झाकणारा पोशाख घातला म्हणजे सगळ्यांनीच घालावा असे आमचे मत नाही. हा प्रश्न निर्णय स्वातंत्र्याचा आहे. मला जर माझे अंग झाकायचे असेल तर तो अधिकार मला असायला हवा. जेव्हा एक मुलगी मोठी होऊ लागते म्हणजेच तिला मासिक पाळी येते तेव्हा अशा प्रकारच्या छोट्या कपड्यांमध्ये खेळणे तिला अवघड वाटू शकते. परंतु तरीही महिला खेळाडूंना पोशाख निवडीचे स्वातंत्र्य दिले जात नाही याची खंत वाटते." 


पुरुषसत्ताक मानसिकतेच्या समाजात सारखाच खेळ खेळणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. पुरुषांचा खेळ म्हणजे मर्दानी, ताकदवान या दृष्टीने पाहिला जातो तर महिला खेळाडूंनी मात्र खेळत असताना आपले केस दिसू नयेत, हालचाली आकर्षक असल्या पाहिजेत याची काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारच्या नाना फूटपट्ट्या लावून महिला खेळाडूंची पारख केली जाते. ज्या प्रकारे स्त्रीला स्त्री म्हणून किंवा माणूस म्हणून न पाहता लैंगिक आकर्षणाची वस्तू म्हणून पाहिल जात त्याचप्रकारे तिच्या खेळाचे लैंगिकिकरण करून खेळताना ती सुंदर दिसेल, आकर्षक दिसेल व तिचे अंग प्रदर्शन होईल म्हणून तिला खेळामध्ये तिच्या सोयीचा वाटेल अशा पोशाखाची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्याऐवजी शॉर्टस घालण्याची बंधन तिच्यावर घातली जातात.


काही दिवसांपूर्वीच झालेल्या युरोपियन बिच हँडबॉल चॅम्पियनशिप मध्ये नॉर्वेच्या महिला संघाने बिकनी बॉटम ऐवजी बाईट शॉट्स घालण्याचा निर्णय घेतला तर युरोपियन हॅण्डबॉल फेडरेशनने त्यांचा हा पोशाख ॲथलेटिक्स युनिफॉर्म नियमानुसार नाही असे सांगून टिमवर जवळ जवळ दीड लाख रुपयांचा दंड लावला. नाॅर्वेजियन हँडबॉल फेडरेशनने आपल्या खेळाडूंना पाठिंबा देत लावलेल्या दंडाचा विरोध केला. नॉर्वजियन फेडरेशनचा हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे.  2018 मध्ये झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने एक विशेष ब्लॅक कॅट सुट बनवून घेतला होता. परंतु तो पोशाख टेनिसमध्ये स्टँडर्ड समजल्या जाणाऱ्या स्कर्ट्स किंवा शॉर्ट्सच्या नियमात बसणारा नाही असे सांगून बॅन करण्यात आला. 


त्यांनतर झालेल्या मुलाखतीमध्ये सेरेना विल्यम्स सांगते की," प्रेगनेंसी नंतर सततच्या ब्लिडींगमुळे विशेष प्रकारचा ब्लॅक कॅट सुट बनवून तो मी वापरला होता. ज्यामध्ये स्पॉटिंग होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली होती." परंतु तरीही त्याला बॅन करण्यात आले. जास्त दूर न जाता भारताची टेनिस स्टार प्लेअर सानिया मिर्झाला अगदी करीयरच्या सुरुवातीपासूनच तिच्या पोशाखांना घेऊन टार्गेट केलं गेलं. तेव्हा १८ वर्षाच्या सानियाने आपल्या करीयरच्या आड येणाऱ्यांना उत्तर दिलं , "जोपर्यंत मी जिंकत आहे, लोकांना यावर विचार करण्याची गरज नाही की, मी ६ इंच लांबीचा स्कर्ट घालते की ६ फूट लांबीचा. मी कसे कपडे घालावेत ही माझी वैयक्तिक बाब आहे. ही गोष्ट आश्चर्य करणारी आहे जेव्हा जेव्हा मी टी - शर्ट घालते पुढील तीन दिवस यावर चर्चा चालू राहते.  म्हणजेच महिलांच्या खेळातील कौशल्यापेक्षा तिच्या कपड्यांना अधिक महत्त्व दिलं जात आणि प्रसंगी दंडात्मक कारवाई ही केली जाते. एकूणच काय तर खेळाच्या मैदानातही स्वतः ला सिद्ध करताना महिलांना करावा लागणारा संघर्ष पण काही सोपा नाही. शेवटी काय तर महिला खेळाडूंच्याच नाही तर एकूणच महिलांच्या पोशाखांना घेऊन ज्या उलट - सुलट चर्चा घडवून आणल्या जातात, महिलांना टार्गेट केलं जातं. अशा प्रकारची चर्चा पुरुषांच्या पोशाखाला घेऊन होत नाही किंवा पुरुष टार्गेट ही केले जात नाहीत. मुळातच भारतासारख्या देशात मुलींना करियर करण्याची संधी फार कमी प्रमाणात मिळते. त्यातही खेळामध्ये करियर करण्याची परवानगी मिळणे कठीणच. कारण अनेक प्रकारच्या गैरसमजुती मध्ये अडकून असलेल्या समाजात खेळ म्हणलं की, धावणं, पडणं आल आणि यामुळेच मुलींचे कौमार्य भंग होण्याची भीती पालकांना जास्त असते म्हणूनच आपल्याकडे मुलगी 12 -13 वर्षाची झाली की तिचं खेळणच बंद होऊन जात. त्यातूनही संघर्ष करीत खेळाच्या मैदानात उतरणाऱ्या मुलींना अंगावर घालाव्या लागणाऱ्या पोशाखापासून ते आपल्याला लैंगिक आकर्षणाची वस्तू म्हणून पाहणाऱ्या नजरांना ही सामोरे जावे लागते.

 

म्हणूनच जर्मनीच्या महिला जिमनॅस्टिसने उचललेले हे पाऊल त्या सर्व मुली व महिलांना बळ देणारे ठरणार आहे. ज्यांना आपल्या कपड्यांवरून आपण आकर्षणाची वस्तू बनून न राहता आपल्याला आपल्या खेळासोबत आपल्याला पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य आहे असे वाटते. म्हणून या जर्मन महिला खेळाडूंचे हे पाऊल क्रांतिकारी ठरते. ऑलिम्पिक सारख्या सर्वोच्च खेळात हे पाऊल उचलले जाणे म्हणजे सर्व महिला खेळाडूंनाच नव्हे तर एकूण सर्व महिलांना मिळालेली ही प्रेरणाच आहे.


- पूजा कांबळे, सोलापूर

- 9860574679

(लेखिका स्त्री विषय अभ्यासिका आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा