Breaking


इराण - इस्रायल तणाव : अरबी समुद्रात घनघोर लढाईचे संकेत


जेरूसलेम : जगभरातील काही देशांमधील तणाव वाढत असताना ठिणगी पडून युद्ध पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इस्रायल आणि इराण दरम्यानचा तणाव वाढत आहे. इस्रायलने इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ओमानजवळील समुद्र भागात एका तेल टँकरवर ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. इराणवर हल्ला करण्यासाठी आम्ही तयार असल्याची धमकी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली.


अरबी समुद्रातील ओमानच्या हद्दीत हल्ला झालेले तेल टँकर जहाज इस्रायली अब्जाधीशाच्या कंपनीचे होते. या तेल टँकर जहाजावरील हल्ल्यासाठी इराण जबाबदार असल्याचा आरोप ब्रिटन आणि अमेरिकेने केला आहे. तर, इराणने हे आरोप फेटाळून लावले आहे.

वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत इस्रायलचे संरक्षण मंत्री बेंजामिन गॅट्झ यांनी इराणवर हल्ला करण्यास तयार आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी होय असे उत्तर दिले. इराणविरोधात सैन्य कारवाई करण्याची आवश्यकता भासेल त्या ठिकाणी कारवाई करण्यास सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले.

इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खतीबजादेह यांनी गॅट्झ यांनी दिलेली धमकी ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे क्रूर उल्लंघन असल्याचे म्हटले. त्यांनी ट्विट करून म्हटले की, इराणविरोधात कारवाई झाल्यास त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. इस्रायलने आमची परीक्षा घेऊ नये असेही खतीबजादेह यांनी म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा