Breaking
जुन्नर : किसान सभेला सोबत घेऊन खटकाळे - खैरे ग्रामस्थांनी केली ग्राम प्रशासनाकडे रोजगाराची मागणी


जुन्नर किसान सभेला सोबत घेऊन खटकाळे - खैरे ग्रामस्थांनी ग्राम प्रशासनाकडे रोजगाराची मागणी केली. ग्रामीण अर्थकारणाला गती देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा चालू केला. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा प्रयत्नशील आहे.


ग्रामीण जीवनाची आर्थिक उन्नती होण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुणे जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय किसान सभा  दोन वर्षापासून रोजगार हमीच्या कामांना केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे. वास्तविक कोरोनाच्या भीषण महामारी मुळे ग्रामीण  समाज जीवन हायास आले आहे. अनेक तरुणांचे हात हे बेरोजगार झालेले आहेत या बेरोजगार हातांना काम देण्याची गरज ओळखून किसान सभेने गावोगावी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले.


या रोजगार मेळाव्यांना मजुरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेला महिलावर्ग, तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. 

याचाच एक भाग म्हणून 18 ऑगस्ट 2021 रोजी अखिल भारतीय किसान सभा आणि पंचायत समिती, कृषी विभाग प्रशासनाकडून खटकाळे गावांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देवळे, हिरडी, खटकाळे, निमगिरी, केवाडी, या गावांमधील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अनेक ग्रामस्थांनी आम्हाला गावांमध्येच रोजगार उपलब्ध व्हावा अशी मागणी या मेळाव्यामध्ये मांडली होती.


या सर्व मजुरांची मागणी केंद्रस्थानी मानून किसान सभेने  कसोशिने पाठपुरावा चालू केला त्याचेच फलित म्हणून दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी खटकाळे - खैरे गावातील 167 ग्रामस्थांनी ग्रामप्रशासनाकडे रोजगार हमीचे अर्ज भरून दिले आणि आम्हाला गावातच रोजगार उपलब्ध व्हावा अशा प्रकारची मागणी केली. 

यावेळी अनेकांकडे जॉबकार्ड उपलब्ध नसल्यामुळे अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाली. ग्रामसेवक के.टी. साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते जुन्नर येथे असल्यामुळे ग्राम रोजगार सेवक सचिन मोरे यांच्याकडे अर्ज देण्यास सांगितले. तसेच जॉबकार्ड बाबत त्रूटी दूर केल्या जातील, असेही सांगण्यात आल्याची माहिती नवनाथ मोरे यांनी दिली.


यावेळी ग्राम रोजगार सेवक सचिन मोरे, शिपाई खंडू मोडक यांच्याकडे अर्ज देण्यात आले. ग्रामसेवक साबळे यांनी सोमवारी पोच देण्याचे दूरध्वनीवरून आश्वासित केले.

यावेळी नवनाथ मोरे, राहुल मोडक, रामदास केदारी, मोहन मोडक तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा