Breaking
जुन्नर : युवकांच्या तत्परतेने ढिगाऱ्याखालील कुटूंबाला वाचवण्यात यश !


जुन्नर / आनंद कांबळे : भिंत अंगावर पडूनही युवकांच्या तत्परतेने एकाच  कुटुंबातील ६ ही सदस्य आश्चर्यकारक रित्या वाचले आहेत. रविवार पेठ येथील ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिराजवळ काल रात्री अंदाजे साडे आठ नंतर ही घटना घडली.


जेवण झाल्यानंतर कुटुंबिय विनीत सहानी वय ४०, शोभा सहानी वय ३५, प्रतिक्षावय ११, श्रेया वय १०, श्वेता वय ५, विवेक १८ महिने  ( सर्वजण रा. संत कबीरनगर, उत्तरप्रदेश) निवांत बसले असता सदर कुटूंबीयांवर भिंत कोसळून सर्व कुटुंब भिंतीखाली गाडले गेले. विनीत सहानी पेंटर म्हणून जुन्नर मध्ये काम करत आहेत.


भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश जोगळेकर, अरुण शिंदे, अनिल सावंत , व्यावसायिक बंडू कर्पे, मिलिंद झगडे, अभय पाठक, भागेश गाडेकर, महेश घोडेकर, हर्षवर्धन कुर्हे, मंदार ढोबळे तसेच रविवार पेठेतील इतर युवक कार्यकर्ते यांनी त्वरित मातीचा ढिगारा बाजूला करून सदर कुटुंबाला बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे हलविण्यात आले.


युवकांनी दाखवलेल्या तत्परतेचे जुन्नर परिसरामध्ये कौतुक होत आहे. हे कुटुंब परप्रांतीय असून उदरनिर्वाह साठी ५ ते ६ वर्षांपासून याठिकाणी राहत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा