Breaking
खासदार डॉ.अमोल कोल्हे कोरोनाच्या विळख्यात, सहकाऱ्यांनाही तपासणी करण्याचे आवाहन


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आपला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ट्विटर वर दिली.


त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, कोरोना संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा "आरटी-पीसीआर"(RT-PCR) रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Test Report Positive) आला आहे. मात्र असं असलं तरी प्रकृती स्थिर आहे.

कोरोनाची आरटी- पीसीआर (RT-PCR) चाचणी अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी म्हणून शिरूर लोकसभा मतदार संघातील पूर्वनियोजित दौरे आणि कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. खासदार डॉ.कोल्हे म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदार संघातील पूर्वनियोजित दौरा, पुढील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. कोरोना कालावधीतील निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन खासदार डॉ.कोल्हे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा