Breaking


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अकोल्यात जोरदार शक्तिप्रदर्शन ! हजारो श्रमिक उतरले रस्त्यावर


अकोले (अहमदनगर) : शेतकरी, कामगार, कर्मचारी व आदिवासी समुदायाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज अकोले शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. लॉकडाउन काळात प्रलंबित असलेल्या श्रमिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सिटू कामगार संघटनांच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी अकोले तहसील कार्यालयासमोर बेमुदत सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी माकपने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. मोर्चामध्ये शेतकरी, आदिवासी व श्रमिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या विविध संघटनांच्या माध्यमातून आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, अर्धवेळ स्त्री परिचर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


9 ऑगस्ट क्रांती दिनापासून सुरू असणाऱ्या सत्याग्रहा मध्ये आदिवासी वाड्या पाड्यांचे रस्ते, वीज, पाणी या मूलभूत प्रश्नांना सोडविण्यासाठी मागण्या घेण्यात आल्या होत्या. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. डॉ. किरण लहामटे यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत अकोले तहसील कार्यालयामध्ये दिनांक 10 ऑगस्ट रोजी सविस्तर बैठक घेतली.


पिंपळगाव खांड येथील ठाकर वाडीला रस्ता व वीज, तसेच फोफसंडी येथील आदिवासी वस्तीसाठी फोफसंडी ते कोंबड किल्ला रस्ता व कोंबड किल्ला पायथ्याशी असणाऱ्या मुठेवाडीला विजेची व्यवस्था, खडकी येथील आदिवासी वाडीला वीज, हे सर्व प्रश्न आदिवासी विकास निधी व आमदार निधीतून मार्गी लावण्या बद्दलचे ठोस आश्वासन आमदार किरण लहमटे यांनी दिले. 


या कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे व परवानग्या तातडीने उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात आली व याबाबतचे सर्व प्रस्ताव हे आंदोलकांच्या समक्ष संबंधित यंत्रणेकडे जमा करण्यात आले. वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांचा आढावा प्रांत अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी दिनांक 11 ऑगस्ट रोजी अकोले तहसील कार्यालयामध्ये बैठक आयोजित करून घेतला. आंदोलक, वन विभाग तसेच महसूल विभागाचे प्रमुख सर्व अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातीलही अनेक प्रश्न या वेळी किसान सभेच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्यासमोर मांडण्यात आले. संबंधित प्रश्‍न सोडवण्याच्या बद्दल अत्यंत सकारात्मक भूमिका प्रांताधिकारी यांनी घेतल्याबद्दल आंदोलकांनी समाधान व्यक्त केले.


तालुक्यातील सर्व श्रमिकांना घरकुले द्या, घरकुल ड यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू करा, बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करा, घरेलू कामगारांची नोंदणी तातडीने सुरू करा, घरेलू कामगारांना कोविड काळातील अनुदान तातडीने द्या, आशा कर्मचाऱ्यांना रुग्णालयात मुक्कामाची स्वतंत्र व्यवस्था करा, आशा कर्मचारी व अर्धवेळ परिचारिकांचे थकित मानधन तातडीने वर्ग करा, आशा गटप्रवर्तक यांचे विविध प्रश्न तातडीने सोडवा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्या, अतिरिक्त कामाचा बोजा कमी करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवा, अशा विविध मागण्या यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. संबंधित विभागाने आंदोलकांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. 


याप्रसंगी निघालेला मोर्चा वसंत मार्केट या ठिकाणावरून सुरू झाला. शहरांमध्ये श्रमिक एकजुटीच्या जोरदार घोषणा देत माकपने या वेळी जबरदस्त शक्तिप्रदर्शन केले. तहसील कार्यालयावर मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर 35 रुपये दर द्या व दूध क्षेत्राला एफ.आर.पी. चे संरक्षण लागू करा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला यावेळी जाहीर पाठिंबा देण्यात आला. 


आंदोलनातील बहुतांश मागण्या मान्य झाल्यामुळे नागरिकांना जल्लोष केला. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, जुबेदा मणियार, आराधना बोराडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, भारती गायकवाड, आशा घोलप, गणेश ताजणे, नंदू गवांदे, संदीप शिंदे, अविनाश धुमाळ, सविता काळे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे, गणपत मधे, शिवराम लहामटे, किसन मधे, निवृत्ती डोके आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा