Breaking
ग्रामविकासात लोकसहभाग महत्वाचा दुवा आहे - पोपटराव पवार


दिंडोरी / पंकज गवारी : सध्याची सामाजिक परिस्थिती खूपच विदारक होत चालली आहे ही बाब कोरोनाने आपल्याला लक्षात आणून दिली आहे. फक्त पैसा कमवून माणूस सुखी होणार नाही याचीही जाणीव आजच्या परिस्थितीतुन झाली आहे असे प्रतिपादन आदर्श गावाचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.


श्री अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान संचालित आणि कर्मयोगी कै. एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन संयोजित श्री गोपालकृष्ण व्याख्यानमालेत उदघाटन पर पुष्प गुम्फताना पवार बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की कोरोनाच्या काळात गावातील लोकांनी एकत्र येऊन काय काम केले. एकमेकांना काय सहकार्य केले त्यावर गावातील कोरोनाची स्थिती अवलंबून होती. ज्या गावांनी पक्षभेद विसरून कोरोनाला अटकाव केला त्या गावात कोरोनाला माघारी जावे लागले. सध्या गावापुढे कोरोना हेच संकट नसून भविष्यात पाणी टंचाई, शेंद्रीय भाजीपाला, कड धान्ये अशी कितीतरी आव्हाने येणार आहे. त्या संकटाना सामोरे जाण्यासाठी लोकसहभाग एव्हढाच पर्याय आहे. गावातील लोकांनी गाव विकासासाठी एकत्र आले पाहिजे. पक्ष आणि ग्रामपंचायत यांचा काहीच संबंध नसतो. पक्ष विरहित कामातून कामाचा आदर्श निर्माण केला तर सर्व राज्यकर्ते दखल घेतातच. दखल घ्यावी असं काम करायचं असेल तर विविध उपक्रमात लोकांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. लोकांचा कृतिशील सहभाग वैचारिक परिवर्तनशिवाय शक्य नाही. ते परिवर्तन अशा व्याख्यानमालांनी सहज शक्य आहे असेही पवार म्हणाले.

गेल्या 65 वर्षाच्या या व्याख्यानमालेच्या इतिहासात या वेळी पहिल्यांदाच ऑनलाईन संपन्न होत आहे. मोहाडी पंचक्रोशी बरोबरच अनेक ठिकाणच्या लोकांनी देखील या व्याख्यानाचा लाभ घेतला.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी केले. यावेळी त्यांनी व्याख्यानमालेचा ऐतिहासिक आढावा घेतला आणि त्यामागील उद्देश विषद केला. सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय प्रा धनंजय देशमुख यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन धनंजय वानले यांनी मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण जाधव, दत्ता कुलकर्णी, कैलास कळमकर, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वनिता देशमुख, विलास पाटील, पुंडलिक कळमकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा