Breaking


कोरोना कालावधीतील आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन करीत 'फोटोग्राफी प्रदर्शन' संपन्न !


मुंबई : सलाम बॉम्बे फाउंडेशन यांच्यावतीने कोरोना कालावधीतील नियमांचे पालन करीत 'फोटोग्राफी प्रदर्शन' पार पडले. सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या मीडिया अकादमीतर्फे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


सलाम बॉम्बे फाउंडेशन मार्फत गत १९ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या  कलात्मक व गुणात्मक विकासासाठी प्रिव्हेंटीव हेल्थ प्रोग्राम, खेळ, कला, मिडीया ह्या अकादमी आणि व्यावसायिक कौशल्य विकास असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे सर्व उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविले जात आहेत. सदर उपक्रमांपैकी सलाम बॉम्बे मिडीया अकादमीव्दारे इयत्ता ७ वी ते ९वी च्या  विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य, संवाद कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, क्रिएटिव्ह रायटींग अशा कौशल्यांचे प्रशिक्षण, ह्या क्षेत्रांमधील  करिअरची ओळख व मार्गदर्शन दिले जाते.

फोटोग्राफीचे प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षणातून विकसित झालेल्या कौशल्यांना सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करुन देणे अतिशय महत्त्वाचे आहे. याकरिता अकादमी मार्फत दरवर्षी १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात येतो. यासाठी फोटोग्राफी क्षेत्रातील नामवंत मास्टर फोटोग्राफर्स विद्यार्थ्यांना विविध सत्रांद्वारे मार्गदर्शन करतात व विद्यार्थी विविध छायाचित्रांचे प्रकल्प करतात. विद्यार्थांनी काढलेली उत्तम छायाचित्रे इतर विद्यार्थ्यांसाठी व प्रेक्षकांसाठी प्रदर्शनामार्फत सादर केली जातात. 

यावर्षी जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने फोटो-जर्नालिजम विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे एक मर्यादित प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १३ ऑगस्ट २०२१  रोजी त्रिवेणी संगम म.न.पा. शालेय इमारत सभागृह, तळ मजला, करी रोड (पूर्व), मुंबई – १२ येथे सकाळी ११:३० ते संध्याकाळी ६ पर्यंत आयोजित करण्यात आले होते. 

सदर प्रदर्शनासाठी अनेक वर्षांपासून फोटो-पत्रकारितेचे कार्य करित असलेले छायाचित्रकार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांना घेऊन जसे कि, मुंबई मेरी जाण, द फूटपाथ, नो वेअर टू वॉक, द मोबाईल फोन बेन अँड ब्लेसिंग, डेली स्लम लाईफ, या विषयावर छायाचित्रे काढली. महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषयक गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन करत या प्रदर्शनाला काही ठराविक अधिकारी वर्ग व प्रमुख पाहुणेच प्रत्यक्ष उपस्थित होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिक्षण समती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षणाधिकारी राजू तडवी, शिक्षण कला विभागाचे प्राचार्य. दिनकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

सलाम बॉम्बे फाऊंडेशनचे कार्य हे खऱ्या अर्थाने सलाम करण्यासारखे आहे. बृहन्मुंबई म.न.पा शाळेच्या विद्यार्थ्यांना संधी देऊन अनेक हिरे घडवण्याचे काम संस्थेमार्फत केले जात आहे, असे प्रतिपादन शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा