Breaking


पिंपरी चिंचवड : मनपा स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे सह चार ताब्यात, एसीबी ची मोठी कारवाई, शहरात मल्टी लुटालूटी चा झिंग लपापा


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मनपाच्या स्थायी समितीच्या कार्यालयात धाड टाकली. भर दुपारी एसीबी च्या अधिकाऱ्यांनी एका ठेकेदारांच्या तक्रारीवरून ही कारवाई केली आहे.


स्थायी समितीची बैठक (दि.18 ऑगस्ट) संपताच एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली. आज स्थायी समितीची बैठक असल्यानं महापालिका इमारत परिसरात ठेकेदारांची मोठी गर्दी होती. महापालिकेतील स्थायी समिती कार्यालयाचा एसीबीने ताबा घेतला.

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. या सर्वांना आता पुण्यात आणण्यात आले आहे. भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट महापालिका भवनातील स्थायी समिती कक्षात छापा टाकल्याने सगळेच हादरले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारची कारवाई झाली आहे. भाजपच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत असताना ही कारवाई झाल्याने याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायक कक्षात सध्या ‘एसीबी’चे अधिकारी ठाण मांडून बसले होते. तसेच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षामध्येही एसीबीचे अधिकारी झडती घेणार आहेत. भाजप स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह समितीचे सदस्य व नगरसेवक या कारवाईने हादरले आहेत.

पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांना विचारले असता सध्या कारवाई सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिक तपशील त्यांनी दिला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा