Breaking


आदिवासी नेत्यांना आणि आजी, माजी लोकप्रतिनिधींला खुला प्रश्न विचारणारी पोस्ट होतेय व्हायरल !


अकोले : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी नेत्यांना आणि आजी, माजी लोकप्रतिनिधींना खुला प्रश्न विचारणारी पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. 


कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गावागावांत यावर चर्चा पहायला मिळत असून राजकीय वर्तुळात मात्र अजूनही यावर प्रतिक्रिया उमटलेली नाही. काय आहे पोस्ट तर पाहुयात !


■ आदिवासी नेत्यांना आणि आजी, माजी लोकप्रतिनिधींला खुला प्रश्न : 

आदिवासी दिनी झिंगलेल्या तरुणांच्या खांद्यावर बसून नाचायला आदिवासी नेत्यांना कशाचा आनंद झाला होता ? 

कोरोनाचे तडफडत शेकडो लोक मेले त्याचा ?

तालुक्यात रोजगार नसल्याने आई, बाप, भावाला नारायणगावाच्या बाजारात मजुरीसाठी आजही उभं राहावं लागतं त्याचा ?

आदिवासींच्या रेशनवर आजही डल्ला मारत गरिबांच्या अन्नात माती कालवली जाते त्याचा ?

रोजगार हमीच्या कामावर गरिबांना काम न देता जेसीबी वाल्यांचं चांगभलं होतं त्याचा.

वाड्या वस्त्यांवर आजही वीज, पाणी, रस्ते, शिक्षणाच्या सोई नाही त्याचा.

घरकुल योजना बंगलेवाल्यांना मिळाली. आदिवासी मात्र खोपटातच राहिले त्याचा.

आदिवासी मुलांना गेले वर्षभर मोबाईल अभावी शिक्षणापासून वंचित राहावं लागलं त्याचा ?

कशाचा आनंद झाला होता दारू पिलेल्या तरुणांच्या खांद्यावर बसून नाचायला... मिरवून घ्यायला ? 

नेत्या (?) हो उत्तर द्या !

आदिवासी हा इथला मूळ निवासी ! 
तो कायम  जंगला मध्येच राहिला !

भारतीय संविधानाने आदिवासींना माणसांमध्ये आणले आणि या विकास प्रक्रियेमध्ये सामील केले, जेणेकरून आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे.              

अकोले तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे आणि इथला मतदारसंघ सुद्धा आदिवासींसाठी राखीव आहे. 

हे सगळं असताना आदिवासी समाजाचा इथे अजिबात विकास झालेला नाही.

समाजाचं कोणालाही देणंघेणं नाही. 

समाजामध्ये फूट पाडून राजकारण केलं जातंय. 

जाती जातीत फूट पाडून, द्वेष पसरवून, नामांतराचे राजकारण करून आपली पोळी भाजण्यासाठी प्रयत्न केले जातायेत.

जातीच्या नावानं तरुणाईला भडकवले जातय.

स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे होत आहेत तरीही आदिवासींचे ज्वलंत प्रश्न तसेच आहेत. 

आजही ठाकर समाजाच्या वाड्या-वस्त्याची अवस्था बघा रस्ता, विज, पाणी, शिक्षण पोचलेले नाही. 

ईकडे मात्र कोणी लक्ष देत नाही.  

हे सगळं विसरून दुःख, दारिद्र्य, यातना कानामागे टाकून ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी आदिवासी समाज आपल्या क्रांतिकारकांचे विचार ऐकण्यासाठी एकत्र येतो. 

पण होतं काय, तथाकथित नेतेमंडळींना हा सामाजिक कार्यक्रम व्हायला पाहिजे याचा विसर पडतो. विचार मंथनाचा विसर पडतो. धांगडधिंगा झाला, आपल्याला मिरवता आले म्हणजे झालं असं त्यांना वाटतं.

आमकी संघटना तिकडे कार्यक्रम घेते तर दुसरी संघटना भलतीकडेच कुठेतरी, कोणाचाच ताळमेळ लागेना. आदिवासींनी हेही कानामागे टाकलं !

मग सुरु होतो तो वेगवेगळ्या संघटनांचा कार्यक्रम. 

क्रांतिवीरांच्या प्रतिमेसमोर डिजेवर भलतेसलते गाणे वाजवले जातात.  

सुरू होतो तो धिंगाणा, डीजेच्या तालावर वेडेवाकडे हावभाव करून नशा करून  नृत्य केले जातं आणि या झिंगलेल्या तरूणाईच्या खांद्यावर बसून समाजाचे नेते समजणारे स्वतःला मिरवून घेतात. 

किती ही लाजीरवाणी गोष्ट ?  

 हे दिवस बघण्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली काय ?  

आपण क्रांतिवीर राघोजी भांगरे, क्रांतीविर ठाकूर भाई, क्रांतीविर बिरसा मुंडा, क्रांतीविर राया ठाकर, तंट्या भिल, उमाजी नाईक, यांचे नाव घेतो.  नामांतराचं राजकारण करतो.

समाजाचे पुढारी म्हणणाऱ्यांना कळायला पाहिजे आपले क्रांतिकारक आदिवासींच्या प्रश्नावर लढले. 

त्यांनी जंगलाचा अधिकार मिळवून दिला त्याच प्रश्नावर आजही आदिवासी समाज लढतो आहे. 

जंगलाचा अधिकार, रस्ता, पाणी, मुलांना शिक्षण, रोजगार, रेशन मागतो आहे. 

आपले प्रश्न आजही सुटलेले नाहीत. अर्ध्या भाकरीसाठी आजही आपण दुसऱ्याच्या बांधावर रोज उभे आहोत.
 वाटेकरी व वेठबिगारी म्हणुन दुसऱ्याच्या शेतावर काम करतोय.

माय मावल्यांच्या इज्जती आजही धोक्यात आहेत.

तरुणांना आजही शिक्षण नाही. रोजगार नाही. अन्न नाही. पाणी नाही. रेशन नाही. निराधार योजनेचे लाभ नाहीत. घरकुल नाही. साधे जातीचे दाखले नाहीत.

मग आपल्याला  कशाचा आनंद होतोय...! 

आदिवासी दिनी अकोल्याच्या रस्त्यांवर दारू पिलेल्या तरुणांच्या खांद्यावर बसून आपण कशाचा जल्लोष करतोय ?

का आपण आदिवासी समाज बांधवांच लक्ष विचलीत करतोय ? 

आपण नक्की कुणाला मूर्ख बनवतोय ?

तालुक्यात रोजगार कोणाकडेच नाही म्हणुन आदीवासी तरुण व्यसनाच्या आहारी जातोय. 

काय आहे तरुणांच भवितव्य ? 

बंडकऱ्यांचा वारसा आपण सांगतो. बंडकरी कशासाठी लढले हे मात्र कधी जाणून घेत नाही. सांगत नाही.

किती हा बेजबाबदारपणा ?

आदिवासी नेते देतील उत्तर ?

का वागतोय असे आपण ?

आपलाच
कॉम्रेड एकनाथ मेंगाळ
95035 18798

1 टिप्पणी: