Breaking
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, दलित कुटूंबाला भरचौकात बांधून मारहाण


चंद्रपूर : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालूक्यातल्या वणी खुर्द गावात घडली. फुले - शाहू - आंबेडकरांचा महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या राज्याला लाजीरवाणी आणि माणूसकीला कलंकित करणारी घटना आहे.


वणी खुर्द या गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका दलित कुटूंबाला बांधून मारहाण करण्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. त्यामुळे चोवीस तास उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झालेली नाही. किती लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, कुणाला अटक करण्यात आली का, याबाबत काहीही माहिती देण्यास स्थानिक पोलीस नकार देत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गावातील दोन - तीन महिलांच्या अंगात देवी आल्या आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ - दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबांना बांधून बेदम मारहाण केली. वृद्ध, महिलांनाही मारहाण करण्यात आली . हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूकपणे पाहात बसले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही. यात ७ जण जखमी झाले. त्यांना जिवती ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर दोघांना घरी पाठवण्यात आले, तर पाच गंभीर जखमींना चंद्रपूरला हलविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा