Breaking
पुणे : जुन्नर तालुक्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी भरगच्च निधी !


नारायणगाव : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आज एका बैठकीत पर्यटन विकासासाठी महत्वाचा  निर्णय घेतला आहे. या बैठकीत जुन्नर तालुक्यातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी भरगच्च ६६ कोटींचा निधी जाहीर केली असून, पहिल्या टप्प्यात ओझरसाठी २० कोटी तर लेण्याद्रीसाठी १५ कोटी रुपयांचा नीधी देण्यात येणार आहे.


महाराष्ट्र राज्यातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. गेल्या काही काळात कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना पर्यटन वाढीकडे पुन्हा एकदा लक्ष देऊन पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने पाऊले उचलली आहेत.


आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील पर्यटन स्थळे विकासासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अष्टविनायक तीर्थक्षेत्र परिसर व पर्यटन विकासाबाबत चर्चा झाली.

यामध्ये अष्टविनायकांपैकी जुन्नर तालुक्यातील ओझर आणि लेण्याद्री परिसर पर्यटन विकासासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी ४० कोटी रुपये ओझरसाठी तर २६ कोटी रुपये लेण्याद्रीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. या निधीपैकी पहिल्या टप्प्यात ओझरसाठी २० कोटी व लेण्याद्रीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी देण्यात येणार आहे.


यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके म्हणाले की, शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या या विकास निधीबद्दल मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री व पर्यटन विभागाचे सर्व अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

या बैठकीला खा.सुनील तटकरे, आ.रोहित पवार, आ.अशोक पवार यांसह पर्यटन विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

- संकलन - रवींद्र कोल्हे / रफिक शेख / आनंद कांबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा