Breaking


रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे प्रश्न संयुक्त बैठकीत सोडविणार; शेतकरी विकासाच्या आड येणार नाहीत - सारंग कोडलकर


जुन्नर / रवींद्र कोल्हे : पुणे नाशिक हायस्पीड लोहमार्ग जुन्नर तालुक्याच्या ज्या-ज्या गावातून जात आहे, तेथील बाधित शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी अशी त्रिसदस्य बैठक घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रांताधिकारी सारंग कोडलकर यांनी रेल्वे विरोधी संघर्ष समितीला दिले असल्याची अधिकृत माहिती आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की,जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव, वडगांव - कांदळी, पिंपळवंडी व आळे आदी गावांतील शेतकऱ्यांचा विरोध आहे. हायस्पीड लोहमार्गाला विरोध दर्शविला आहे. सोमवार( दि.२ ऑगस्ट ) रोजी आळेफाटा येथे रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन आंदोलन करण्यात आले.

तेव्हा बाधित शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांकडून आंदोलनाला मोठा प्रतिसाद तर मिळालाच, मीडियाने आंदोलनाची दखल घेतल्याने प्रांताधिकारी सारंग कोडलकर यांनी बाधित शेतकरी आणि रेल्वे संघर्ष विरोधी कृती समितीला भेटीसाठी वेळ दिली होती. मात्र अधिकारी अपरिहार्य कारणास्तव आंदोलन कर्त्यांच्या भेटीला जाऊ शकले नाही. म्हणून त्यांनीच रेल्वे संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना जुन्नरला भेटायला बोलाविले. 

त्यानुसार प्रांताधिकारी सारंग कोडलकर आणि महारेलचे उपमहाव्यवस्थापक सिद्धलिंग शिरोळे, जयंत पिळगावकर यांनी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष निलेश भुजबळ, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास हांडे, आणि काही बाधित शेतकरी यांची भेट घेतली. 

यावेळी भुजबळ म्हणाले की, सर्व बाधित शेतकऱ्यांसमोर चर्चा करावी, असे सांगितले. त्यावर कोडलकर यांनी सर्व बाधित शेतकऱ्यांची लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे (लोहमार्गाला) बाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचे निवेदन "रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आले.यावेळी बाधित शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान रेल्वे संघर्ष कृती समितीने केलेल्या आंदोलनाची माहिती सर्व प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्याने शासन दरबारी आंदोलनाची दखल तर घेतलीच परंतू आंदोलनाला प्रसिद्धी दिल्याने शासन दरबारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटीसाठी वेळ देणं भाग पडले, अशी चर्चा तालुक्यात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा