Breaking


‘एसएफआय’ ने हाती घेतली ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम ; माहूरच्या तरुणांचा सहभाग....माहूर : माहूर शहरातील प्राचीन पांडवलेणी पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे आज विकासापासून दूर राहिली आहे. त्यामुळेच पर्यटकही या लेण्यांकडे पाठ फिरवित असल्याचे विदारक चित्र आहे. लेण्यांच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना केले गेले नसल्यामुळे आज घडीला पांडवलेणी परिसरात झाडे झुडपे गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुरातन विभागाच्या उपायोजनाची वाट न पाहता सामाजिक दायित्व म्हणून एसएफआय व गडकिल्ले संवर्धनच्या माहूर टीमने पांडवलेणी परिसर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.


श्रीक्षेत्र माहूरचे पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व आहे. राष्ट्रकुट काळात निर्मिती झालेली प्राचीन पांडव लेणी हा इथला ऐतिहासिक ठेवा आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा ठेवा दुर्लक्षिततेच्या गर्तेत सापडला आहे. लेणी परिसरात सोयी-सुविधांचा अभाव तर आहेच शिवाय परिसर स्वच्छता बाबतीतही पुरातन विभागाकडून कमालीचे दुर्लक्ष केला जात आहे.शैक्षणिक व सामाजिक जीवन जगत असताना सामाजिक बांधिलकी जपत पुरातन वारसा विद्रुपीकरण थांबून स्वच्छता निर्माण करून पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उदांत हेतूने प्रेरित स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया व गडकिल्ले संवर्धन टीमच्या माहूर शहरातील व तालुक्यातील तरुणांनी केले. यावेळी पुरातन पांडवलेणी परिसर स्वच्छ करून त्यामध्ये पावसाळ्यात वाढलेले गवत व झाडे झुडपांचे पालव्या तोडण्याची मोहीम हाती घेऊन पांडव लेणीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे सामाजिक कार्य हाती घेतल्याने माहूर तालुक्यातून या तरुणांच्या जाणिवेचे व केलेल्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


एसएफआयचे नेते प्रफुल कउडकर, विशाल नरवाडे, असिफ गुलशर खान व गडकिल्ले संवर्धन टीमचे गणेश वाडेकर, विजय कदम, प्रसाद चौधरी, गजानन बांडे, नागेश कांबळे, पवन जटाळे, पवन सेलूकर, प्रथमेश आराध्ये यांच्या पुढाकाराने माहूर शहरातील असंख्य तरुणांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा