Breaking
शिक्षक संघटनेतर्फे पंचायत राज समितीस विविध मागण्यांचे निवेदन


सुरगाणा (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुका महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे पंचायत राज समितीस विविध मागण्यांचे निवेदन कमिटीचे प्रमुख आमदार डॉ. देवराव होळी, आमदार अनिल पाटील, किशोर पाटील, किशोर जोरगेवार यांना देण्यात आले.


निवेदनात म्हटले आहे की, तालुका हा अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रातील असून तालुक्यात रस्ते, दळणवळण, आरोग्य, शिक्षण, मोबाईल टॉवर, पिण्याचे पाणी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मोबाईल टॉवर नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शैक्षणिक मार्गदर्शन करता येत नाही. जिल्हा परिषद शाळेचे विज बिल शासनामार्फत भरण्यात यावे. आदिवासी भागातील शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी. आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना आदिवासी पेसा क्षेत्रात काम करत असेपर्यंत पेसाचा लाभ देण्यात यावा तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. आदिवासी भागातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे नवीन बांधकाम करण्यात यावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


निवेदनावर अध्यक्ष पांडुरंग पवार, उपाध्यक्ष मनोहर चौधरी, सरचिटणीस तुकाराम भोये, भागवत धुम, सुधाकर भोये, उत्तम वाघमारे, भास्कर बागुल, हरिराम गावित, रतन चौधरी, मनोहर भोये आदिंच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा