Breaking
सांगोला तालुक्याच्या रखडलेल्या सर्व सिंचन योजना पूर्णत्वास नेणार जयंत पाटील यांची ग्वाही


सांगोला (अतुल फसाले) : पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी दोन हात करत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सांगोला तालुक्यातील धरतीमातेला हिरवा शालू नेसविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला तालुक्याच्या शासन दरबारी रखडलेल्या सर्व सिंचन योजना पूर्ण करून सांगोला तालुक्याच्या वाट्याचे मंजूर सर्व पाणी तालुक्याला मिळवून देणार असल्याचे अभिवचन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपक साळुंखे पाटील यांना दिले.


आवंढी ता. जत येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपक साळुंखे पाटील उपस्थित होते. जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना नव्याने सहा टीएमसी पाणी मंजूर केल्याबद्दल आवंढी गावातील नागरिकांनी जयंत पाटील यांचा विशेष सत्कार केला. याच मुद्द्यावरून बोलताना दिपक साळुंखे पाटील म्हणाले, जत तालुक्यातील वंचित गावांचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. ६५ गावांना सहा टीएमसी पाणी मिळाल्यास येथील शेती व शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत. जतच्या शेजारीच शिवेला असणाऱ्या सांगोला तालुक्यातील पाणीप्रश्नही तितकाच गंभीर आणि ज्वलंत आहे. सांगोला तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या पन्नास वर्षांपासून येथील जनता संघर्ष करीत आहे. जत तालुक्याचा पाणीप्रश्न आता मार्गी लागला आहे. तेव्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांनी आता आमच्या दुष्काळी सांगोला तालुक्याकडे लक्ष द्यावे, व शासन दरबारी टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, सांगोला शाखा कालवा, उजनी उपसा सिंचन योजना व जिहे-कठापूर योजना अशा विविध सिंचन योजनांतून सांगोला तालुक्याच्या वाट्याला मंजुर असणारे सर्व पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच रखडलेल्या सिंचन योजनांना भरीव निधीची तरतूद करून सर्व योजना पूर्णत्वास न्याव्यात अशी विनंतीही यावेळी दिपक साळुंखे पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांना केली.


यावर बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कायापालट करणे हे स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्वप्न होते यानुसार त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी सांगोला तालुक्याच्या वाट्याला विविध सिंचन योजनांतून मंजूर असलेला पाण्याचा प्रत्येक थेंब येथील शेतकऱ्यांना मिळवून देऊ. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी रखडलेल्या आणि अपूर्ण अवस्थेत असलेल्या या सर्व सिंचन योजनांना भरीव निधीची तरतूद करून सर्व योजना मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेवटी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा