Breaking


अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सदोष मोबाईल व पोषण ट्रॅकर अँप मुद्याला घेऊन विराट मोर्चा


कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोबाईल व पोषण ट्रॅकर ऍप व इतर मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढला.


■ आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

1. अंगणवाडीच्या कामकाजासाठी शासनाने दिलेला मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो आता जुना झाल्यामुळे सतत नादुरुस्त होतो व त्याच्या दुरुस्तीसाठी ३ ते ४ हजार रुपयांचा तर काही ठिकाणी आठ हजारांपर्यंत खर्च येतो व तो सेविकांकडून वसूल केला जातो. तरी हा प्रकार आपण ताबडतोब थांबवावा. शासनाने दिलेले हे सर्व जुने मोबाईल परत घ्या व नवीन, चांगल्या दर्जाचे व क्षमतेचे आधुनिक मोबाईल द्या. कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांना त्यांच्या खाजगी वैयक्तिक किंवा त्यांच्या कुटुंबाच्या सामाईक मोबाईलवर शासकीय काम करण्यास भाग पाडू नये. कारण हा मोबाईल त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती व विशेषतः त्यांचे पाल्य आपल्या ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा खाजगी कामासाठी वापरत असतात. ते तो वापरत असताना शासनाला पाठवण्याच्या माहितीत चुकीचे संदेश जाण्याचा धोका आहे.


2. केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रॅकर ऍप हा सदोष असून तो सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लादला जात आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये रॅम व रॉम कमी असल्यामुळे तो डाऊनलोड होत नाही. त्यामुळे त्यासाठी सेविकांना आपल्या खाजगी वैयक्तिक मोबाईलमध्ये तो डाऊनलोड करावा लागला आहे. इंग्रजी न येणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यात त्रयस्थांच्या मदतीशिवाय माहिती भरणे शक्य होत नाही. हे एकदाच करण्याचे नाही तर दैनंदिन काम आहे व ते रोज अशा त्रयस्थ व्यक्तींकडून करवून घेणे अशक्य आहे. शिवाय या ऍपमध्ये असलेल्या, डिलिटचा पर्याय नसणे, वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम किंवा द्यायच्या सेवांबाबत कॅसप्रमाणे कोणतेही मार्गदर्शन न येणे, भरण्याची पद्धत अतिशय किचकट असणे अशा त्रुटींमुळे कामात मदत होण्याऐवजी उलट ओझे वाढले आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असताना इंग्रजीमध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती करणे योग्य नाही तरी एकतर तो ऍप संपूर्णपणे मराठी करून त्यातील सर्व त्रुटी दूर करा अन्यथा तो ऍप रद्द करा.

3. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मूळ काम लाभार्थ्यांना सहा सेवा देणे हे आहे. त्यांची पूर्तता झाल्यावर केवळ मोबाईल ऍपमध्ये माहिती पाठवण्यात अडचणींमुळे कमी पडल्यामुळे मानधन अथवा लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात कपात करणे अन्यायकारक ठरेल. तरी मानधन अथवा आहार कोणत्याही ऍपला जोडू नये व त्या दोन्हीत कोणत्याही प्रकारची कपात करू नये.


4. मोबाईलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनिसांना देण्यात येणारा रुपये ५०० व २५० प्रोत्साहन भत्ता मिळण्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. सेविका काम करत असूनही त्यांना योग्य मिळत नाही, परंतु त्यांच्या मदतनिसांना मिळते. अशी देखील उदाहरणे आहेत. तरी त्यात सुधारणा करा. मोबाईलचे वाढलेले काम पाहता या भत्त्यात किमान २००० व १००० अशी वाढ करा. 

5. मोबाईलवरील काम वाढल्यापासून सेविकांचे पद रिक्त असलेल्या अंगणवाडीची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणे सेविकांना अशक्य झाले आहे तरी अशी अतिरिक्त जबाबदारी कुणावरही लादण्यात येऊ नये. ज्यांना अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे त्यांना जादा मानधन मिळावे, रिक्त जागांवर ताबडतोब भरती करावी. 

6. अंगणवाडी सेविका मदतनीसाना शासनामार्फत युनिफोर्मचे पैसे अद्याप मिळाले नाहीत ते तत्काळ मिळावेत. 


7. कोरोना महामारीच्या काळात सर्व्ह व इतर काम करीत असताना ज्या सेविकांचे दुःखद निधन झाले आहे त्यांना अद्याप शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही ती तत्काळ मिळावी. 

8. ज्या अंगणवाडी मदतनीस सेविका सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांना अद्याप सेवानिवृतीचे लाभ मिळाले नाहीत ते तत्काळ मिळावेत. 

9. अंगणवाडी सेविकांना शासकीय नियम प्रमाणे दर पाच वर्षाने एकतीस रुपये मानधन वाढ मिळते ती तत्काळ मिळावी.

वरील मागण्या बाबत आपण योग्य तो निर्णय घ्यावा व आम्ही दिलेले मोबाईल स्वीकारावे व शासनाकडून लवकरात लवकर नवीन मोबाईल उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, अशी मागती कॉ.आप्पा पाटील, कॉ.जयश्री पाटील, कॉ.सरिता कंदले, कॉ.शोभा भंडारे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा