Breakingआंबेगाव : 108 रुग्णवाहिकेसाठी तिरपाड आणि अडविरे परिसराची अधिकारी वर्गाकडून पाहणी


किसान सभेच्या व जनतेच्या सततच्या पाठपुराव्याला नक्कीच येईल यश...


आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्यासाठी नुकतेच किसान सभा, आंबेगाव तालुका, समितीने उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ यांना आरोग्य विषयक मागण्यांचे निवेदन पाठवले होते, हे प्रश्न न सुटल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता.


या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग उपसंचालक डॉ.संजोग कदम यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेला आमंत्रित केले होते, त्यानुसार दि.८ सप्टेंबर रोजी संघटनेचे शिष्टमंडळ व आरोग्य विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांची सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत आहुपे ते डिंभा या भागात 108 ची एकतरी रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे, अशी मागणी किसान सभेने केली होती.


यावेळी ही मागणी पूर्ण करण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक 108 रुग्णवाहिका व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी हे एकत्रित या भागाची पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करतील असे ठरले होते. त्यानुसार नुकतेच जिल्हा व्यवस्थापक 108 रुग्णवाहिका डॉ.वेदव्यास मोरे, इ.एम.एस.समनव्यक जिल्हा रुग्णालय औंध, पल्लवी येवले, व 108 चे आंबेगाव, जुन्नरचे पर्यवेक्षक विवेक बेलवटे यांनी एकत्रित तिरपाड, अडविरे या भागाची पाहणी केली. याचबरोबर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांची ही पाहणी केली तसेच आहुपे खोरे आणि पाटण खोरे यांची ही पाहणी केली. पुढील चार दिवसात हे अधिकारी सविस्तर अहवाल सादर करून या भागात 108 रुग्णवाहिकेची असलेली गरज त्यांच्या वरिष्ठ कार्यलयास सादर करणार आहे.


यावेळी किसान सभेचे राजू घोडे, अशोक पेकारी, बाबू आंबवणे यांनी या अधिकारी वर्गाची भेट घेऊन या भागात रुग्णवाहिकेची असलेली गरज व संघटनेने केलेली मागणी व त्याची गांभीर्यता विषद केली. तसेच या परिसरात 108 ची रुग्णवाहिका आणण्यासाठी आमचे प्रयत्न कमी पडणार नाही, असा निर्धार किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा