Breaking


ब्रेकिंग : माध्यमातील वृत्तानंतर बार्टीला ९१.५० कोटींचा निधी तातडीने वितरित


मुंबई, दि. 13 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला 91.50 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.


राज्य सरकारने दोन वर्षांपासून बार्टीचे अनुदान बंद केले असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते, अनुदान बंद केल्याने बार्टी ही संस्था बंद पडते की काय अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली होती, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी 90 कोटी रुपये तसेच महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती साठी दीड कोटी असे एकूण 91.50 कोटी रुपये स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आले आहेत.


तसेच बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.


बार्टीमार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आदींची सद्यस्थिती जाणून घेत काही नवीन योजना देखील आखण्यात येत आहेत, याबाबत बार्टी स्तरावर लवकरच एक सर्वंकष बैठक घेण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.


अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल कुटुंबातील दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याबाबतची योजना बार्टी मार्फत सुरू केली असून, या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेच्या निधीला धक्का लागणार नाही व कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा