Breaking


युथ गेम्स आॅल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये चांदवड तळेगावरोहीच्या खेळाडूंचा डंका


चांदवड, (सुनिल सोनवणे) ता. ३० : तालुक्यातील तळेगाव रोहीचा आवाज पुन्हा एकदा दिल्लीत घुमला आहे. नवी दिल्लीत झालेल्या युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियन शिपमध्ये तळेगाव रोहीच्या तीन  युवा खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आहे. 


युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत अमोल वाकचौरे याला कुस्तीत, ऋषिकेश गाढे याला बॉक्सिंग तर प्रविण भोकनळ याला आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक तर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळाले आहे. 


चांदवडच्या इतिहासात प्रथमच एकाच गावातील एकाचवेळी तीन खेळाडूंना सुवर्णपदक मिळण्याची पहिलीच वेळ आहे. अर्जुन पुरस्कार विजेता तथा रोईंगपटू दत्तू भोकनळच्या तालमीत तयार झालेल्या  या युवा खेळाडूंच्या यशाने चांदवड तालुक्याची मान उंचावली आहे.


आम्ही तिघेही खेळाडू गरीब कुटुंबातील आहोत. माझे वडील तर बांधकाम कामगार आहेत. आमची आर्थिक परिस्थिती नसतानाही आम्हाला घरच्यांनी काटकसर करून खेळासाठी पैसे उपलब्ध करून दिले. तर दत्तू भोकनळ यांनी आम्हाला मार्गदर्शन करतानाच आपल्या घरीच खेळासाठीचे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. म्हणूनच आम्हाला हे यश मिळाले आहे.

- अमोल वाकचौरे, सुवर्ण पदक विजेता


सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या युवा खेळाडूंना अर्जुन पुरस्कार विजेता तथा रोईंगपटू दत्तू भोकनळचे मार्गदर्शन मिळाले आहे. दत्तुने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले तेव्हापासून या गावातील व परिसरातील युवा खेळाडूंना क्रिडा स्पर्धांचे आकर्षण वाढले आहे. या खेळाडूंची कोणत्या खेळात क्षमता आहे हे ओळखून त्यांना तळेगाव रोही येथेच उपलब्ध  साहित्याचा उपयोग करून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यानंतर नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी हे खेळाडू पात्र झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा