Breaking

म्हैसाळ योजनेतून कोरडा व टेंभूतून माण नदीत पाणी सोडून नदीवरील सर्व बंधारे त्वरित भरून द्यावेत


सांगोला (अतुल फसाले) : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील माण आणि कोरडा नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे पिण्याच्या, जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न आजही "आ" वासून उभा आहे. तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि तालुक्यातील पशुधन जतन करण्यासाठी म्हैसाळ योजनेतून कोरडा व टेंभू योजनेतून माण नदीत तात्काळ पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.


पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह बहुतांशी ठिकाणी अतिवृष्टीमुळे या भागातील मोठ्या नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असूनही नेहमीच पाण्याचे व पावसाचे दुर्भिक्ष असणाऱ्या सांगोला तालुक्यात मात्र कोरडा तसेच माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शेतातील उभ्या पिकांना पाणी नसल्याने कोरडा व माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पिके गमवावी लागतात की काय..? अशीच परिस्थिती सध्या कोरडा, अफ्रुका व माण नदीकाठच्या शेतकऱ्यांची झाली आहे. खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी, तसेच कोरडा, माण नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय थांबवणसाठी, शासनाने तात्काळ म्हैसाळ योजनेतून कोरडा आणि टेंभू योजनेतून माण नदीत पाणी सोडून सांगोला तालुक्यातील गळवेवाडीपासून ते मेथवडेपर्यंत या नदीवर असलेले सर्व छोटे-मोठे बंधारे तसेच परिसरातील तलाव भरून द्यावेत. आणि येथील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी शहाजी पाटील तसेच दिपक साळुंखे पाटील यांनी लेखी पत्राद्वारे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा