Breaking



सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत दुसऱ्यांदा नऊ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया


आशादायक : शासनाची डॉक्टर आपल्या दारी योजनेची फलश्रृती


सुरगाणा ता.१६ (दौलत चौधरी) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल थोरात, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात दुसऱ्यांदा ९ बालकांवर विविध प्रकारच्या आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 


याच शस्त्रक्रिया करण्यासाठी पालकांना नाशिक, दिंडोरी, गुजरात राज्यातील खारेल, वासदा, चिखली, बलसाड, सुरत, वापी येथे जावे लागत होते. या शस्त्रक्रियेमुळे गरीब आदिवासी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील पालकांना दिलासा मिळाला आहे. मोफत शस्त्रक्रिया करणेकामी नाशिक येथील निष्णात बालरोग तज्ञ सर्जन डॉ. बाबुलाल अग्रवाल यांच्या देखरेखीखाली बालरोग भूलतज्ञ डॉ. संजय चौधरी, डॉ. प्रविण पवार, डॉ. योगिता जोपळे, डॉ.श्रीकांत कोल्हे, डॉ. माधुरी गावित, डॉ. दिपिका महाले, डॉ. सुनयना पवार, डॉ. भास्कर देशमुख, डॉ. कमलाकर जाधव, अधिपरिचारिका प्रज्ञा गोसावी, क्रिस्टीना केळकर, अधिपरिचारक हेमंत बागुल, राहुल देवाडे, धनाबाई चव्हाण, बेबी महाले, हिरा केंगा, जे. एस. चौधरी आदींनी शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीते करीता परिश्रम घेतले. 


"अजून ही अतिदुर्गम आदिवासी भागातील जनतेमध्ये चुकीच्या गैरसमजुतीमुळे लहान बालकांच्या विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यास पालक धजावत नाहीत. भोंदू बाबा तसेच वैदु कडे जातात. अंगणवाडी किंवा शाळा तपासणी दरम्यान अनेक बालके विविध किरकोळ आजारांची लक्षणे असलेली आढळतात. शस्त्रक्रिया केल्यास भविष्यात संतती होत नाही, शस्त्रक्रिया केल्यास त्या कुटुंबात व्यंग असलेली मुलं जन्माला येतात. शस्त्रक्रिया केली तर मुलं हमखास दगावण्याची भीती वाटते, मुलं मोठं झाल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया करु असे अनेक गैरसमज दुर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांना पालकांची समजूत काढावी लागते. मी पण तुमच्यातीलच एक डाॅक्टर आहे. त्यामुळे माझ्यावर तरी भरोसा ठेवा अशी समजूत काढावी लागते. मुलं मोठं झाल्यावर शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही. मनातील हा गैरसमज संभ्रम दूर करून पालकांनी स्वतःपुढे आल्यास शासन स्तरावरून निश्चितच चांगले प्रयत्न सुरु आहेत."

- डॉ. योगिता जोपळे (ग्रामीण रुग्णालय सुरगाणा)


"माझी मुलगी खुशाली ही १४ वर्षांची असून शाळेत शिकत आहे. तिच्यावर यशस्वीपणे वैद्यकीय अधिकारी यांनी शस्त्रक्रिया केली आहे. माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आम्ही दोघेही घर संसार चालविण्यासाठी मोलमजुरी करतो. हि शस्त्रक्रिया करण्यासाठी पैशाची उसनवार फेडीचे कर्ज घेण्याचे नियोजन होते. ते हजारो रुपयांचे कर्ज काम करुन फेडण्यास दोन, चार वर्षे मजूरी करावी लागली असती. मात्र महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत डॉक्टर आपल्या दारी हे शिबिर आयोजित केल्याबद्दल आम्हाला खुप मोठा हातभार लागला आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे खुपचं आभारी आहे."

पालक - पुंडलिक गायकवाड (रा. बंधारपाडा ता. सुरगाणा)




यावेळी शिक्षक रतन चौधरी, रामभाऊ थोरात, भगवान आहेर, ललित चव्हाण आदी उपस्थित होते. या शिबिरात हायड्रोसिल, साईट इन्क्वाईनल हर्नीया, फायमोसिस या प्रत्येकी तीन आजाराचे बालक अशा ९ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये सागर गावित रा.राशा, खुशाली गायकवाड वय १४ वर्ष रा. बंधारपाडा, नितीन गावित वय १० वर्षे रा.खेड, रुपाली महाले वय १६ वर्षे रा.ठाणगाव, अनिकेत गावित वय १६ वर्षे रा. अलंगुण, पियुष जाधव वय १३ वर्षे रा.उंबरपाडा, अर्णव गावित वय.२ वर्षे रा. अंबोडे, तनिष्क लोखंडे वय ८ वर्षे रा. गोपाळपूर, योगीराज गाढवे वय ४ वर्षे रा. माळेगांव, या बालकांचा समावेश आहे. या शिबिराचे नागरिकांनी प्रशासनाचे स्वागत केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा