Breakingसंकटातुन मुक्त कर–जगणे सुसह्य कर, औद्योगिक नगरी आरोग्यनगरी होऊ दे! सामान्य आणि मध्यम वर्गीयांच्या प्रार्थना


पिंपरी चिंचवड : कोरोना काळातील हा दुसरा गणेशोत्सव अतिशय सध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. सार्वजनिक उत्सवावर निर्बंध आहेत. कोरोना काळात शहरातील हजारो मध्यम वर्गीय, अल्पउत्पन्न गटातील श्रमिकांचा आर्थिक स्तर खालावला आहे. औद्योगिक उत्पादनात चढ उतार आहेत.


विशेष भत्ते, ओव्हर टाइम, व्यवसायातून मिळणारी कमाई घटल्यामुळे दैनंदिन गरजा, आरोग्यासाठी लोकांनी पैसे राखून ठेवले आहेत. गणेश मूर्तीकारांचे व्यवसाय ठप्प आहेत. तुलनेने गणेशमूर्तीची विक्री ४५ टक्क्यांहून कमी झाली आहे. वर्क फ्रॉम होममुळे अनेक कर्मचारी त्यांच्या मुळगावी कामे करत आहेत, शाळा ऑनलाइन असल्यामुळे कुटुंब कबिला गावाकडे आहे.

 


करोनामुळे विधात्याने माणसाला कसे जगायचे, हा संदेश दिला आहे. चंगळवादी जीवन क्षणभंगुर आहे. आर्थिक समृद्धीपेक्षा आरोग्य समृद्धीसाठी आम्ही गणेशाला विनवणी केली आहे. आमच्या मनपाने महामारीच्या काळात चांगले काम केले, आता आम्ही परिसरात स्वच्छता ठेवून औद्योगिक नगरीला आरोग्य नगरी बनवायला हवी, पुन्हा महामारी नको हीच गणेशाला प्रार्थना!

- सुनील कोल्हे/मालती कोल्हे (औद्योगिक कर्मचारी-शाहूनगर चिंचवड)गणपती ही बुद्धीची देवता आहे. करोना महामारीमुळे जवळजवळ दीड वर्षे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थी आणि शिक्षक यांचा प्रत्यक्ष संवाद पूर्णपणे थांबला आहे, त्यामुळे कधी एकदा महाविद्यालयात विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहतील आणि पूर्वीचा आनंद, समाधान प्राप्त होईल, या प्रतीक्षेत आम्ही आहोत, अवघा मानव भीती मुक्त होवो, रोजगार, व्यवसाय पुन्हा सुरू होवोत, श्री गणेशा चरणी हीच प्रार्थना !

- प्रा.डॉ.वंदना पिंपळे/ऍड.विठ्ठल पिंपळे (वाल्हेकरवाडी, चिंचवड)आमचे चाळीत राहणारे छोटे कुटुंब आहे. छोट्या कंपनीत पूर्वीसारखी कामे राहिली नाहीत. यावर्षी खाद्यतेल सहित किराणा महागाई खूप वाढली आहे. त्यामुळे लाडू मोदक, उपवासाच्या पदार्थांच्या किमती वाढल्या आहेत, गेले दोन वर्षे सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत, गणपती उत्सव आहे असे वाटत नाही. कोरोना घालव, आणि पुन्हा सुगीचे दिवस येवोत, हे शहर आम्हाला उपाशी ठेवणार नाही, याची खात्री आहे.

- मनीषा लाटकर/अश्विन लाटकर (आकुर्डी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा