Breaking


घोडेगाव : किसान सभेच्या मागणीला यश, जनावरांचे लसीकरण सुरू...घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात जनावरांना साथीच्या आजाराची लागण झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. या पार्श्वभूमीवर किसान सभेने ३ सप्टेंबर रोजी आंबेगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते. शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी तात्काळ प्रशासनाने मोठया प्रमाणात जनावरांचे लसीकरण करणे गरजेचे होते.


या निवेदनात संघटनेने आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात जनावरांच्या लम्पि व इतर पशु रोगांविषयी लसीकरण करण्यात यावे, आदिवासी भागातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने नियमित सुरु ठेवावेत. या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने, पंचायत समितीवर आजारी जनावरेसह मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.


या निवेदनाची प्रशासनाने दखल घेत दि.०६ सप्टेंबर रोजी, किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत पशुधन विकास अधिकारी डॉ.अभ्यंकर व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्यासोबत चर्चा झाली. 


त्यामध्ये पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून ५००० अतिरिक्त लसींची मागणी केली होती व त्याप्रमाणे आज दि.०६ सप्टेंबर रोजी ही लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आदिवासी भागात तात्काळ लसीकरण सुरू केले जाईल असे ठोस आश्वासन यावेळी देण्यात आले.


यानुसार, दि.०६ सप्टेंबर रोजी पहिले लसीकरण शिबिर तळेघर येथे पार पडले व सुमारे १५० जनावरांचे लसीकरण पार पडले. तसेच दि.०७ सप्टेंबर - बोरघर, दि.०८ सप्टेंबर - पाटण, दि.०९ सप्टेंबर - तिरपाड, दि.१० सप्टेंबर - निगडाळे, याबरोबरच जांभोरी, चिखली, राजेवाडी, पोखरी, गोहे बुद्रुक, गोहे खुर्द, राजपुर, तेरुंगण, कोंढवळ, निगडाळे, फलोदे, सावरली, पिंपरी, साकेरी, कुशिरे खुर्द, कुशिरे बुद्रुक, मापोली येथील लसीकरणाचे नियोजन, दि.०७ सप्टेंबर रोजी करून संघटनेस व जनतेस कळविण्यात येणार आहे.


दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने, काही ठिकाणी दवाखाने बंद आहेत, ते चालू करण्याचा प्रयत्न केला जाईल. असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी, लेखी आश्वासन  संघटनेच्या शिष्टमंडळास प्राप्त झाल्यानंतर व प्रशासनाने तातडीने लसीकरण सुरू केल्यामुळे, जनावरे सहित काढण्यात येणारा मोर्चा संघटनेने तात्पुरता स्थगित केला आहे. परंतु आदिवासी भागात कोट्यवधी रुपये खर्च करून जनावरांचे दवाखाने बांधले आहेत, परंतु रिक्त पदांमुळे हे दवाखाने बंद आहेत, त्यामुळे हे दवाखाने सुरू करण्यासाठी संघटना पुढील काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, सद्यस्थितीत लसीकरण तातडीने होण्यासाठी संघटना प्रशासनास पूर्ण सहकार्य करणार असल्याची देखील माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


या बैठकीस किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी, तालुका कार्यकारणी सदस्य दत्ता गिरंगे, एसएफआयचे अविनाश गवारी इ. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा