Breaking


पिंपरी चिंचवड : महापालिका आयुक्तांकडून कायद्याचे उल्लंघन, हातगाडी, स्टॉलधारक करणार महापालिकेसमोर तीव्र आंदोलन


पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे  आयुक्तांना पद स्विकारुन सहा महिने पूर्ण झाले. कायद्यांने दर महिन्यास फेरीवाला समितीची बैठक घेणे अपेक्षित आहे, मात्र एकही बैठक न घेता मनमानी पद्धतीने बेकायदेशीररित्या फेरीवाल्यांवर कारवाई करून पथारी, हातगाडी, स्टॉलधारकावर कारवाई करून सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच कायद्याचे उल्लंघन करून त्याची पायमल्ली केली जात आहे. फेरीवाल्यांसाठी जागा निश्चिती बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने करून धमकावून जबरदस्तीने फेरीवाल्यांना दुसरीकडे व्यवसाय करण्याचे सांगितले जात आहे, नुकतेच आयुक्तानी शहरातील विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना कालावधी मध्ये मोठे नुकसान झालेल्या फेरीवाल्यावरती हा मोठा आघात आहे, याच्या विरोधामध्ये महापालिका भवनासमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय नॅशनल हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.


यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, मनीषा राऊत, वृशाली पाटणे, अनिता शिंदे, राधा वाघमारे,  किरण साडेकर, अनिल जाधव, सुरेश देडे, काशीम तांबोळी, सलीम डांगे, ओमप्रकाश मोरया, सुखदेव कांबळे, बी. आर. गावडे आदी उपस्थित होते.


यावेळी नखाते म्हणाले, महासंघाकडून फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून मनपा आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला मात्र आयुक्तांनी कायद्याने स्थापित झालेल्या समितीची बैठक न घेता मनमानी पद्धतीने एकतर्फी कारवाई केली जात असून दीड वर्षापासून कोरोनात व्यावसायास निर्बंध होते. त्यांचेवर उपासमारिची वेळ आलेली आहे. अशा स्थितीमध्ये आता कुठेतरी थोडा व्यवसाय सुरू झाला आहे, आता त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करून मनपा त्यांचा व्यवसाय हिरावून घेत आहे.

नियमबाह्य पद्धतीने आधार कार्ड व नावांची लिस्ट करून मनपाचे अधिकारी ठराविकांची हितसंबंध असणाऱ्या लोकांची नावे घेऊन त्यांना चांगल्या जागा देतो असे सांगून दिशाभूल केली जात आहे. महापौर नेहमी कारवाईची मागणी करतात. आयुक्तानीं काढलेल्या आदेशानुसार सचोटीने व्यवसाय करणाऱ्या गोरगरीबांवर अन्याय होणार असून मोठ्या मोठ्या प्रकल्पांना वेळ आहे. मात्र गरीब फेरीवाल्यांसाठी आयुक्तांना वेळ नाही हे यातुन दिसत आहे, सर्वांना न्याय भुमिका ठेऊ असे म्हणणारे आयुक्त कायद्याप्रमाणे काम करणार का बेकायदेशीर काम करणार हाच प्रश्न निर्माण झालेला आहे.   


नोंदणीकृत विक्रेत्यावरही अन्यायकारक कारवाई केली जात असून त्यांना प्रशासन पोलिसांचा धाक दाखवून त्यांच्यामध्ये भीती निर्माण करत आहे. या कारवाईच्या विरोधात लवकरच महापालिका भवनावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. पथारी, हातगाडी, टपरी धारकांनी कायदाअंमलबजावणी साठी आणि अन्यायकारक कारवाईच्या विरोधात ठामपणे उभे राहावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा