Breakingठेकेदारांना पोसण्यासाठी महापालिका रुग्णालयासाठी मनुष्यबळ आऊटसोर्सिंग आणि खाजगीकरण - मारुती भापकर यांचा आरोप


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह इतर ९ रुग्णालयांमध्ये १०३८ डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ पुरविण्यासाठी ११ कोटीचा खर्च होणार आहे. दोन वर्षासाठी या रुग्णालयामधील १०३८ कर्मचाऱ्यांवर ९४ कोटींचा खर्च होणार आहे. हे काम बीव्हीजी इंडीया लि., श्रीकृपा सर्व्हीसेस प्रा. लि., रुबी अलकेअर प्रा. लि. या तीन पुरवठाधारकांची दोन वर्षासाठी नेमणूक करण्याचा आयत्या वेळचा प्रस्ताव बुधवार दि. ०८ सप्टेंबर २०२१ रोजी आणून स्थायी समितीसमोर ठेवला व खेळीमेळीच्या वातावरणात सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्ष राष्ट्रवादी, शिवसेनेने सर्वानुमते मंजुर केला आहे.


मात्र या निर्णयाला विरोधही होताना दिसत आहे. या विरोधात माकपने तीव्र आंदोलन केले आहे तसेच माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पाठवून रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.


पुण्यात असलेले बी.जे. मेडीकल कॉलेज, मुंबईतील के. एम. रुग्णालय तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारची आणि महापालिकेची रुग्णालये विना खाजगीकरण सुरु आहेत मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे रुग्णालयामध्ये खाजगी कर्मचारी भरण्याचा घाट कशासाठी ? हा निर्णय संबधित ठेकेदारांना पोसण्यासाठी असुन यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे की काय ? असा संशय माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात निर्माण केला आहे.


माजी नगरसेवक भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना कंत्राटी पद्धतीवर भरण्यात येणारी डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ यांची नियुक्ती होत असताना त्यांच्या गुणवत्तेबाबत कायम संशय असणार आहे. जसा कोविड महामारीच्या काळात जम्बो रुग्णालय व ऑटो क्लस्टर रुग्णालयाच्या कामकाजाची अनुभूती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी व शहरवासीयांनी नुकतीच घेतली आहे. रुबी अलकेअर रुग्णालयाचे अनुभवही चांगले नाहीत, त्यामुळे हा आपला निर्णय शहरातील गोरगरीब रुग्णांच्या जिवीताशी खेळण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. तसेच वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स सह इतर आवश्यक कर्मचारी ठेकेदार पध्दतीने भरणे म्हणजे या कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. या सर्व कर्मचाऱ्याना  मर्जीतील ठेकेदाराच्या दावणीला बांधणे असे होईल असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा