Breaking

रोजगार अधिकाराकरिता कामगारांचे पुण्यात भव्य आंदोलन


पुणे, ता.३१ : महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या वतीने रोजगाराचा अधिकार आणि कामगारांच्या नोंदणीकरिता (ता.३१) ऑगस्ट रोजी पुणे येथे कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. 


पुण्यातील अप्पर डेपो, कात्रज, दत्तनगर, गोकुळनगर, कोंढवा येथील मजूर अड्ड्यावरील शेकडो मराठी व हिंदी भाषिक बांधकाम कामगार यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी युनियनच्या वतीने पवन इन्सान, अमर घनघाव, किशोर कांबळे, बाबा डोलारे यांनी आपले मत व्यक्त केले. सूत्रसंचालन निमिष वाघ यांनी केले. त्यावेळी घरकामगार संघर्ष समिती सुद्धा आंदोलनात सहभागी झाली होती, तसेच नौजवान भारत सभेतर्फे पाठिंबा देण्यात आला. घरकामगार संघर्ष समितीच्या वतीने अश्विनी खैरनार, कुसुम रोकडे यांनी आपले मत व्यक्त केले. सर्व कामगार प्रतिनिधींनी आपला रोष व्यक्त करत मांडले की, करोना काळानंतर रोजगाराची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे, कामगार उपाशी आहेत आणि राज्य-केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कामगारांच्या नोंदण्या जाणीवपूर्वक रखडवण्यात येत आहेत जेणेकरून सरकारला जबाबदारीमुक्त रहाता यावे. मोदी आणि ठाकरे ही दोन्ही सरकारे फक्त बिल्डर-भांडवलदारांच्या सेवत गुंतली आहेत, आणि बांधकाम कामगार व घरकामगारांना वाऱ्यावर सोडले असल्याची टीका सरकारवर केली.


यावेळी पाठिंबा देताना भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे कॉ. निखिल एकडे म्हणाले की, फक्त कामगार वर्गीय़ पक्षच खऱ्या अर्थाने रोजगाराची हमी देऊ शकतो, तेव्हा कामगारांनी आपले आंदोलन फक्त आर्थिक मुद्यांभोवती केंद्रित न ठेवता कामगार वर्गीय राजकारण समजले पाहिजे.


यावेळी प्रतिनिधीमंडळाला कामगार आयुक्तांनी रखडलेल्या नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच अपघाताने मृत्यू झालेल्या युनियन सदस्य सोपान क्षिरसागर यांना नुकसान भरपाई सुद्धा मंजूर केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा