Breaking'भारत बंद'च्या निमित्ताने संयुक्त किसान कामगार मोर्चा तर्फे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन !


शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी


बीड (ता.२७) : संयुक्त किसान कामगार मोर्चा तर्फे सोमवार २७ सप्टेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक देण्यात आलेली होती. यानिमित्ताने बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात 'भारत बंद'ला पाठिंबा जाहीर केलेल्या सर्व पक्ष आणि संघटनांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले. त्यात संयुक्त किसान कामगार मोर्चाने म्हटले आहे की, लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवून लोकसभा आणि राज्यसभेत शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे मंजूर करण्यात आल्यामुळे देशभरातील शेतकरी समाज संतप्त झालेला आहे. गेली दहा महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या ४-५ सीमांवर प्रचंड संख्येने धरणे आंदोलन सुरू आहे. यामध्ये आजपर्यंत जवळपास ७०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत.


पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस यामध्ये दिवसेंदिवस दरवाढ केल्यामुळे जीवनावश्यक गोष्टींच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. यातून सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. भाजपच्या मोदी राजवटीने अच्छे दिनचे गाजर दाखवून पंधरा लाख रुपये देण्याची घोषणा केली. दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. नोटबंदी करून काळा पैसा बाहेर काढू असे सांगितले. आणि आता नॅशनल मॉनिटायझेशन, पाईपलाईन अँड बॅड बँक अशा घोषणा करून भारतीय मतदारांना वेढ्यात काढण्याचा प्रकार चालू झालेला आहे. दुसऱ्या बाजूला तथाकथित राष्ट्रवादाच्या नावाने श्रमिक जनतेत फूट पाडून, जात आणि धर्माच्या नावावर विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे, अशी टीका आंदोलना दरम्यान शेतकरी नेत्यांनी केली.


संयुक्त किसान कामगार मोर्चाने यावेळी शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करा. बदलण्यात आलेले कामगार कायदे रद्द करून कामगारांनी संघर्षातून मिळवलेले सर्व कायदे पूर्ववत चालू ठेवा. शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार आधारभूत दराचा कायदा करा. वीज कायद्यातील संशोधन मागे घ्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांना हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्या. गतवर्षीचा आणि या वर्षीचा पीकविमा सरसकट त्वरित अदा करा. सोयाबीन पिकाचे दर १२ हजार रुपये प्रती क्विंटल निश्चित करा. यांसह इतर मागण्या करण्यात आल्या. 


या आंदोलनात हमाल मापाडी कामगार संघटना, असंघटित कामगार पंचायत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवक्रांती युवा परिषद, आम आदमी पार्टी, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), महिला फेडरेशन, एआयवायएफ, एपीआय आदी पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या.


या आंदोलनात राजकुमार घायाळ, कॉ. नामदेव चव्हाण, कुलदीप करपे, गणेश बजगुडे, कॉ. उत्तमराव सानप, भाई बाळासाहेब घुमरे, रोहिदास जाधव, अशोक येडे, इद्रिस हाश्मी, कॉ. ज्योतिराम हुरकुडे, भाई राजेंद्र नवले, उद्धव साबळे, ऍड. भीमराव चव्हाण, ऍड. करुणा टाकसाळ, राजकुमार कदम, शेरजमाखान पठाण, कुंडलिक खेत्री, सुहास जायभाये, ऍड. गणेश करांडे, प्रदीप जोगदंड, भाई राजू शेख, राजेशकुमार जोगदंड, अमरजान पठाण, प्रा.मोहनराव परजणे, पंडित तुपे, नागेश मिठे, संगमेश्वर आंधळकर, रामनाथ महाडिक, बळीराम शिंदे, अभिषेक शिंदे, शंकर चव्हाण, शिवा चव्हाण, निखिल शिंदे, आकाश जाधव, आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा