Breakingपिंपरी चिंचवड : आरोग्यसेवेच्या खाजगीकरणा विरोधात माकपचे आंदोलन


पिंपरी चिंचवड : चिंचवड मनपाच्या सुपर मल्टीस्पेशालिटी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह नवीन जुने जिजामाता, भोसरी, आकुर्डीतील दोन्ही आणि थेरगाव, चिंचवड मधील प्रमुख सर्व रुग्णालयाचे कर्मचाऱ्यासाहित खाजगीकरण करण्याचा निर्णय मनपाच्या स्थायी समितीने घेतला आहे. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना प्रमुख पक्षाच्या सदस्यांनी या ठरावाला मान्यता दिली आहे.

 

बीव्हीजी इंडीया लि., श्रीकृपा सर्व्हीसेस प्रा. लि., रुबी अलकेअर प्रा. लि. या तीन पुरवठाधारकांची दोन वर्षासाठी नेमणूक करण्याचा आयत्या वेळचा प्रस्ताव बुधवार दि. ०८ सप्टेंबर रोजी आणून स्थायी समितीसमोर ठेवला व खेळीमेळीच्या वातावरणात सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्ष राष्ट्रवादी, शिवसेनेने सर्वानुमते मंजुर केला आहे. या ठेकेदारी संस्थांना आरोग्य आणि वैद्यकीय सेवा देऊन मनपा सार्वजनिक आणि कल्याणकारी आरोग्य सेवेच्या संकल्पनेला हरताळ फासत आहेत. सामान्य जनतेच्या आरोग्यसेवेचे खाजगीकरण करून कंत्राटदार, ठेकेदारांच्या आर्थिक फायद्यासाठी प्रशासन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्यांचे दलाल झाले आहेत काय आणि या सर्वांनी मनपाची आरोग्यसेवा विक्रीस काढली आहे, असा आरोप माकपने जाहीररीत्या केला आहे.


शहरातील जुन्या हॉस्पिटलचे नुतनीकरण आणि नवी इमारती महापालिकेने करदात्यांच्या पैशाने बांधलेल्या आहेत. पैसा आणि इन्फ्रास्ट्रक्चर महापालिकेचे आहे. महागडी वैद्यकीय उपकरणे महापालिकेची आहेत. मग हे खाजगीकरण कोणासाठी आहे? असा सवाल माकपने उपस्थित करत या खाजगीकरणाच्या विरोधात माकपणे तीव्र आंदोलन केले. या आंदोलनास जनआरोग्य मंचाने पाठिंबा दिला आहे.


जन आरोग्य मंचाचे अशोक वाघिकर म्हणाले की, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा, जिल्हापरिषदा यांच्या आरोग्य सेवा सरकारी आहेत, सार्वजनिक रुग्णसेवा आणि जन आरोग्याची  संविधानिक जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या रुग्णसेवेचा दर्जा खूप चांगला आहे. कोरोना काळातील उत्कृष्ठ रुग्णसेवेमुळे शहरातील मध्यम वर्ग आणि श्रमिकांनी मनपाच्या आरोग्यसेवेचे कौतुक केले आहे. दोन वर्षासाठी ९४ कोटीचे बजेट, कोट्यवधी रुपयांचे  इन्फ्रास्ट्रक्चर खाजगी संस्थांना देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड मनपामध्ये आरोग्याचे खाजगीकरण केले जात आहे.


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथील या आंदोलनाचे नेतृत्व गणेश दराडे, सतीश नायर, अशोक वाघिकर, सचिन देसाई, अपर्णा दराडे, स्वप्निल जेवळे, सुभाष कालकुंद्रीकर, बाळासाहेब घस्ते यांनी केले.


यावेळी युवा आणि महिला संघटनेच्या अमिन शेख, पावसु कऱ्हे, अविनाश लाटकर, सचिन देसाई, शीतल जेवळे, शिवराज अवलोळ, सुषमा इंगोले, नंदा शिंदे, मनीषा जाधव, आशा बर्डे, मंगल डोळस, सुषमा इंगोले, अनिता पवार, संगीता देवळे, ज्योती सूर्यवंशी, महानंदा जोगदंड, रंजिता लाटकर कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासन आणि स्थायी समितीच्या या निर्णया विरोधात घोषणाबाजी करत विरोध केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा