Breaking


पुणे : प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढा अन्यथा २२ सप्टेंबर पासून बेमुदत धरणे - घरेलू कामगारांचा इशारा!


पुणे, दि. २ : पुण्यामध्ये ८० हजार घरेलू कामगारांची महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंद असताना जेमतेम ५ हजार कामगारांना एप्रिल मध्ये जाहीर केलेले रु १५०० कोव्हीड अर्थसहाय्य मिळाले आहे. हजारो नवीन नोंदणी आणि नूतनीकरणाचे अर्ज कामगार आयुक्त कार्यालयात पडून आहेत. याकडे अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधून सुद्धा कामाला गती येत नाही, याचा तीव्र निषेध आज घरेलू कामगारांनी अपर कामगार आयुक्त पोळ यांच्याकडे नोंदवला.


शहरातील अनेक घरेलू कामगार आपल्या अर्जांबद्दल वारंवार विचारणा करीत असून, त्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. अर्थसहाय्य मिळण्याची प्रणाली सुलभ करून जादा कर्मचारी वर्ग नेमून नवीन नोंदणी प्रक्रियेला वेग आणला नाही तर दिनांक २२ सप्टेंबर पासून पुणे जिल्हा घरकामगार संघटने मार्फत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले जाईल असा इशारा कॉ. किरण मोघे यांनी  संघटने तर्फे दिला आहे.    


पिंपरी चिंचवडच्या घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा कॉ. अपर्णा दराडे यांनी सांगितले की, १५०० रु तुटपुंजे अनुदान मिळवताना ऑनलाइन तांत्रिक अडचणी आल्या आहेत, बहुतांश घरेलू कामगार महिलांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, त्या अशिक्षित आहेत, त्यांना ऑनलाइन नोंदणी करता आलेली नाही, मागील वर्षी कोरोनाची लाट आल्यानंतर हजारो फॉर्म आम्ही मार्च २०२० मध्ये भरून दिले आहेत, कामगार आयुक्त कार्यालयाने एकूण घरेलू कामगारांची संख्येचा विचार केलेला नाही, कर्मचारी वर्ग नाही, तातडीने कोरोना काळात त्यांची नोंद करण्यासाठी प्राधान्य देऊन संवेदनशिलतेने अधिकाऱ्यांनी नोंदणीची तातडीने व्यवस्था करायला हवी होती. अधिकाऱ्यांनी नोंदणी करून ६० वर्षावरील घरेलू कामगारांना पण अनुदान मिळण्यासाठी यंत्रणा राबवली पाहिजे. पुन्हा तिसरी लाट आल्यास सरकारचे अनुदान मिळण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घ्यावी असे कॉ. अपर्णा दराडे म्हणाल्या.


कामगार आयुक्त कार्यालयासमोर विविध भागातल्या घरेलू कामगारांनी जमून निदर्शने केली, व निवेदन सादर केले. ग्रामीण भागातील अर्ज स्वीकारण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कॅम्प लावावेत आणि केंद्र सरकारने असंघटीत कामगारांसाठी सुरु केलेल्या नवीन श्रम पोर्टलवर मंडळामार्फत घरेलू कामगारांची परस्पर नोंद करून घेण्याची व्यवस्था करावी अशी ही मागणी संघटनेकडून करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्ष किरण मोघे, सचिव सरस्वती भांदिर्गे, खजिनदार रेखा कांबळे, सहसचिव अपर्णा दराडे, सीटूचे सचिव वसंत पवार, गणेश दराडे, मोहन पोटे आणि शहरातल्या विविध भागातून १०० पेक्षा अधिक घरेलू कामगारांचा या आंदोलनात सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा