Breaking

बाऱ्हे येथे "सही पोषण - देश रोषण" कार्यक्रम संपन्न


सुरगाणा (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प बाऱ्हे यांच्या विद्यमाने जि.प.नाशिक महिला व बालकल्याण समिती सभापती आश्विनी अनिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा व सही पोषण - देश रोषण कार्यक्रम संपन्न झाला.


यात पोषण माह व मासिक सभेचे आयोजन केले होते. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांनी बांबू (वास्ती), शेवग्याची कोवळी पाने, आळू, तेरा, कुरडू, कोयची (कंद), दिहगडी अशाप्रकारे विविध जंगलातील पौष्टिक रानभाज्या, शेंगदाणा लाडू, नागलीचे लाडू, बांबू (वास्ती), कूरडू, डांगर, शेवगा थालीपीठ, शेवगा पराठा, नागलीची भाकर, शेवग्याची पोळी, शेंगदाणा गुळ पोळी अशा विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यावेळी सभापती आश्विनी आहेर व अधिकारी यांनी रानभाज्या व पौष्टिक आहाराचा आस्वाद घेतला व अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले.


कुपोषणावर मात करण्यासाठी पोषण माहमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. परंतु केवळ पोषण महिन्याच्या पुरतेच नव्हे तर कायमचेच काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा. आदिवासी भागातील कुपोषणाला हटवण्यासाठी जंगलातील रानभाज्यांमधील पोषक घटक महत्त्वाचे आहेत. प्रत्येक अंगणवाडीतील शालेयपुर्व शिक्षण उत्कृष्ट व्हावे हे आपले स्वप्न आहे. कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी अतिशय अडचणींचा सामना करत चांगल्या पद्धतीने काम केले. तसेच अंगणवाडी सेविकांच्या अडचणी केव्हाही सांगा सोडवायला तयार आहे असे मत महिला व बालकल्याण सभापती आश्विनी आहेर यांनी व्यक्त केले.


यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपक चाटे, सरपंच परशराम वार्डे, जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका रेखा चौधरी, बाऱ्हे, पळसन बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा