Breakingधक्कादायक : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार


ठाणे : डोंबिवलीमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरणी तब्बल 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं सातत्याने दिसून येत आहे. त्यातच आता मुंबई नजीकच्या डोंबिवलीत भोपर परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँगरेप झाल्याची अत्यंत खळबळजनक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 29 जणांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेतील आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पोस्को) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सुमारे 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूण 29 आरोपींपैकी 23 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर 6 जणांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या 29 आरोपींमध्ये 2 अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांमध्ये आरोपींकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात येत होते. अखेर काल (22 सप्टेंबर) स्वत: पीडित मुलीने मानपाडा पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर ही खळबळजनक घटना समोर आली.

नेमकं प्रकरण काय ?

साधारण जानेवारीत महिन्यात पीडित मुलीच्या प्रियकराने तिच्यावर शारीरिक अत्याचार करत त्याचा व्हिडीओ काढला होता. नंतर याच व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करुन आरोपींनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या पीडित मुलीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, याप्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भोपर परिसरात आरोपींची धरपकड सुरु केली आहे.

पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेत जेव्हा तिच्याकडे विचारपूस सुरु केली तेव्हा तिने अशी पोलिसांना याबाबात माहिती दिली. याबाबत मुलीने दिलेल्या जबाबानुसार अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराले यांनी अशी माहिती दिली की, 'जानेवारी महिन्यात तिच्या एका मित्राने तिच्यावर बलात्कार केला होता. यावेळी त्याने व्हीडिओ देखील शूट केला होता. हाच व्हीडिओ नंतर त्याने आपल्या मित्रांना देखील दाखवला.'

'याच व्हीडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत 29 जणांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत, वेगवेगळ्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेल्याचं म्हटलं आहे'.

दरम्यान, या गुन्ह्यात सहभागी असलेले बहुतेक आरोपी हे एकाच परिसरातील आणि ते पीडितेला आणि तिच्या मित्राला आधीपासून ओळखत होते. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे, त्यामध्ये दोन अल्पवयीन आरोपी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा